Join us

महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक कर्जबुडवे; ट्रान्सयुनियन सिबिलचा रिपोर्ट आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 09:30 IST

Maharashtra Cibil Report: एकूणच महाराष्ट्रात बाहेरून आलेले उद्योजकांची कर्ज प्रकरणे अधिक असतात. नीरव मोदी, मल्ल्या यांच्यासारखे कर्जबुडवे असल्याने त्याचा बोजा महाराष्ट्रावर जास्त दिसत आहे.

देशभरातील बँकांचे कर्ज बुडविण्यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीचे ग्राहक सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे. ट्रान्सयुनियन सिबिलनुसार या दोन्ही राज्यांच्या एकूण ३०, ३५९ कर्जदारांनी तब्बल ८.५८ लाख रुपयांचे कर्ज बुडविले आहे. या सर्वांवर १ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. 

बँकांनी या कर्जबुडव्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ही आकडेवारी ३१ मार्च २०२२ पर्यंतची आहे. ३१ मार्च, २०१७ नंतर या प्रकारच्या कर्जामध्ये तीन पटींची वाढ झाली आहे. तेव्हा ३२ राज्यांच्या एकूण 17,236 बुडव्यांनी एकूण २.५८ लाख रुपयांचे कर्ज बुडविले आहे. 

या रिपोर्टनुसार थकबाकीदारांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे. राज्यातील ७,९५४ थकबाकीदारांचे ३.८२ लाख कोटी रुपये थकीत आहेत. दिल्लीतील केवळ 2,867 लोकांवर 1.14 लाख कोटींचे कर्ज आहे. तेलंगणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर थकलेल्या कर्जातील सर्वाधिक वाटा हा १२ सार्वजनिक बँकांचा आहे. त्यांचे 5.90 लाख कोटी रुपये थकीत आहेत. या बँकांनी २० हजारांहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत.

एसबीआयकडे १.६० लाख कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेकडे १.०८ लाख कोटी थकबाकी आहे. खासगी बँकांचे १.३२ लाख कोटी रुपये थकीत आहेत. त्यांनी थकबाकीदारांवर 6,897 गुन्हे दाखल केले आहेत. विदेशी बँकांचे ५७२ लोकांकडे १३,६६९ कोटी रुपये थकीत आहेत. तर 20 सहकारी बँकांचे 3,599 कोटी रुपये थकलेले आहेत. 

एकूणच महाराष्ट्रात बाहेरून आलेले उद्योजकांची कर्ज प्रकरणे अधिक असतात. नीरव मोदी, मल्ल्या यांच्यासारखे कर्जबुडवे असल्याने त्याचा बोजा महाराष्ट्रावर जास्त दिसत आहे. दिल्लीतही आजुबाजुच्या राज्यांचे व्यवसायिक, उद्योजक येत असल्याने तिथेही हा बोजा वाढलेला दिसतो. यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र आणि दिल्लीत जास्त थकबाकीदार दिसतात.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र