Join us

खासगी बँक कर्मचारी का सोडतायेत नोकरी? आरबीआयने व्यक्त केली चिंता; म्हणाले, असं झालं तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:38 IST

Bank Job Crisis : गेल्या काही वर्षात खासगी बँकींग क्षेत्रात कर्मचारी मोठ्या प्रमाणात राजीनामे देत असल्याने आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे.

Bank Job Crisis : अवघ्या २ दिवसांत नवीन वर्ष सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच भारतीय रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खासगी बँकींग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोक नोकरी सोडत आहे. एकीकडे लोक नोकऱ्यांसाठी तळमळत आहेत. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बँक कर्मचारी राजीनामे देत असल्याने आरबीआयने दखल घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतीच आपली आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की लोक झपाट्याने नोकरी सोडतात त्यामुळे कामावर गंभीर परिणाम होतो. सध्या हा आकडा २५ टक्क्यांहून अधिक पोहोचला आहे, जो खूपच चिंताजनक आहे.

RBI ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, खासगी क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडण्याचे प्रमाण सुमारे २५ टक्क्यांनी वाढले आहे. अशाप्रकारे, कर्मचाऱ्यांनी वेगाने काम बदल असतील तर त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर परिणाम होतो. भारतातील बँकिंगचा कल आणि प्रगती २०२३-२४ या ताज्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

अनेक बँकांमध्ये जॉब स्विचिंग रेट वाढला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की निवडक खासगी क्षेत्रातील बँका आणि लघु वित्त बँकांमध्ये (SFB) कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. २०२३-२४ या कालावधीत खासगी बँकांच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा (PSB) जास्त असेल. परंतु, गेल्या ३ वर्षांत त्यांच्या कर्मचाऱ्यांचा जॉब स्विचिंग रेट झपाट्याने वाढला असून तो सरासरीच्या जवळपास २५ टक्के झाला आहे.

बँकांवर येणार नवीन संकट?अहवालानुसार, याचा थेट परिणाम बँकेच्या ग्राहक सेवांवर होईल. याशिवाय संस्थात्मक ज्ञानाची हानी होत असून भरती प्रक्रियेचा खर्च वाढत आहे. बँकांशी झालेल्या चर्चेत रिझर्व्ह बँकेने सांगितले की, कर्मचाऱ्यांची आउटगोईंग कमी करणे हे केवळ मानव संसाधनाचे काम नाही, तर धोरणात्मक गरज आहे. बँकांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करायला हवे. सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि करिअर विकासाच्या संधी त्यांना उपलब्ध करुन देणे, मार्गदर्शन कार्यक्रम, स्पर्धात्मक फायदे आणि दीर्घकालीन कर्मचारी प्रतिबद्धता निर्माण करण्यासाठी चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे आरबीआयने सांगितले.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्रबँक