Daily limit on UPI: नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ ऑगस्टपासून यूपीआयमध्ये मोठे बदल होणार आहेत. जर तुम्हीही फोनपे, गुगल पे आणि पेटीएम अशा वेगवेगळ्या अॅप्सच्या माध्यमातून यूपीआय वापरत असाल तर आता सर्वात जास्त वापरले जाणारे काही फीचर्स मर्यादित होणार आहेत. खरं तर फोन अॅप्सच्या माध्यमातून लोक वारंवार वापरत असलेल्या सेवांवर ही मर्यादा घालण्यात येणार आहे. यामध्ये बॅलन्स चेक करणं, ऑटोपेला परवानगी देणे, ट्रान्झॅक्शन स्टेटस पाहणं अशा सेवांचा समावेश आहे. यानंतर यूपीआय पेमेंट अॅप्स वापरण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.
यूपीआय नेटवर्कवर जास्त भार पडू नये यासाठी एनपीसीआय यूपीआयशी संबंधित सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सेवांवर मर्यादा घालणार आहे. परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे, बँका आणि पेमेंट अॅप्सना प्रत्येक एपीआय विनंतीचा वेग आणि संख्या मर्यादित आहे याची खात्री करावी लागेल. यात ग्राहक आणि सिस्टम या दोघांनी केलेल्या एपीआय विनंत्यांचा समावेश असेल. बँकेनं किंवा अॅपनं त्याचं पालन न केल्यास एनपीसीआय त्यांच्यावर कडक कारवाई करू शकते.
१ जूनपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' महत्त्वाचे नियम, खिशावर थेट होणार परिणाम
किती वेळा चेक करू शकता बॅलन्स?
जर तुम्हाला UPI अॅप्सवर वारंवार बॅलन्स तपासण्याची सवय असेल, तर तुम्ही आता १ ऑगस्टपासून तुम्ही दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स तपासू शकाल. याबद्दल, Ezeepay चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुशर्रफ हुसेन म्हणाले की, "या नियमामुळे व्यापाऱ्यांना काही गैरसोय होऊ शकते, परंतु त्याचा उद्देश UPI नेटवर्क स्थिर ठेवणे आणि सर्वांसाठी उपलब्ध असणं हा आहे." त्यांनी स्पष्ट केले की वारंवार बॅलन्स तपासणी केल्याने UPI नेटवर्कवर खूप दबाव येतो. यामुळे UPI सिस्टम क्रॅश होण्यासारख्या समस्या अनेक वेळा दिसून आल्या.
एनपीसीआयनुसार पीक टाईममध्ये म्हणजेच सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शिल्लक तपासण्याची सुविधा प्रतिबंधित किंवा ब्लॉक केली जाईल. तसंच, आता बँकांना प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना बॅलन्सची माहिती द्यावी लागेल. यामुळे शिल्लक तपासण्याचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे.
कधी काम करेल ऑटो पे
या बदलांमध्ये ऑटो पेमेंटवरही वेळेची मर्यादा घालण्यात येणार आहे. जे नेटफ्लिक्स, एसआयपी किंवा इतर सेवांसाठी यूपीआय ऑटोपे वापरतात त्यांच्यासाठी आता ऑथरायझेशन आणि डेबिट प्रक्रिया नॉन-पीक अवर्समध्येच केली जाईल. सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९.३० असा पीक टाईम मोजला जाणार आहे. या कालावधीत ही मर्यादा लागू राहणार आहे. या दरम्यान, बॅकएंडला होणारी प्रोसेस आणि सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या सेवांवर मर्यादा तसंच निर्बंध असतील. गेल्या काही काळापासून यूपीआयच्या वारंवार क्रॅश होण्याच्या घटना घडत होत्या. त्यानंतर यूपीआय सेवेच्या वापरावर काही किमान शुल्क घ्यावं, जेणेकरून यूपीआयच्या पायाभूत सुविधा सुधारता येतील, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, आता कोणत्याही शुल्काऐवजी पीक टाईममध्ये ही मर्यादा लागू करण्यात येणार आहे.