Ban of black ink on cheque: रिझर्व्ह बँकेनं चेकवर काळ्या शाईच्या वापरावर बंदी घातल्याचा दावा करणारी एक बातमी नुकतीच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) हा दावा फेटाळत तो खोटा असल्याचं म्हटलंय. सुरक्षा वाढविण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठीच काळ्या शाईने लिहिलेले चेक नाकारले जातील, असं त्यात नमूद करण्यात आलंय.
व्हायरल पोस्टमध्ये काय?
आरबीआयच्या या नव्या नियमानंतर लोकांनी आता धनादेश लिहिण्यासाठी फक्त निळ्या आणि हिरव्या शाईचा वापर करावा, असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये युजर्सना हलकं किंवा अंधुक लिखाण टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पीआयबीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अधिकृत फॅक्ट चेक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केलीये. 'सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की आरबीआयने चेकवर काळ्या शाईचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. परंतु हा दावा खोटा आहे. रिझर्व्ह बँकेनं चेक लिहिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईचा कोणताही विशिष्ट रंग निश्चित केलेला नाही,' असं त्यात नमूद करण्यात आलंय.
रिझर्व्ह बँकेचा नियम काय?
सीटीएसमध्ये प्रत्येक चेकचे तीन फोटो घेतले जातात - फ्रंट ग्रे स्केल, फ्रंट ब्लॅक अँड व्हाईट आणि बॅक ब्लॅक अँड व्हाईट. चेकवर लिहिलेली माहिती पाहण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ग्राहकांनी त्यावर आधारित चेक लिहिण्यासाठी रंगांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. तसंच कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना चेक लिहिण्यासाठी एकच शाई वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, चेक लिहिण्यासाठी एखाद्या विशिष्ट रंगाची शाई वापरण्यात यावी, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलेलं नाही.