ICICI Bank Minimum Balance: खाजगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँकेनं बचत खात्यात किमान शिल्लक रकमेची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.आता आयसीआयसीआय बँकेच्या खातेधारकांना त्यांच्या बचत खात्यात महिन्याला किमान सरासरी ५०००० रुपयांची रक्कम ठेवावी लागेल. हा नियम १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाला आहे. बँकेनं किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमांमध्ये बदल केल्यानंतर शहरी, निम-शहरी आणि गाव खेड्यांमध्ये बचत खात्यातील किमान रकमेत वाढ झाली आहे. आता महानगर आणि शहरी भागात किमान ₹ ५० हजार, निम-शहरी भागात ₹२५ हजार आणि खेड्यांमध्ये ₹१० हजार सरासरी शिल्लक रक्कम राखणं आवश्यक असेल.
पूर्वी, महानगर आणि शहरी भागात सरासरी किमान शिल्लक रक्कम किमान ₹१०,०००, निम-शहरी भागातील शाखांमध्ये ₹५००० आणि गावांमधील शाखांमध्ये किमान ₹२५०० इतकी ठेवणं आवश्यक होतं. आता या वाढीनंतर आयसीआयसीआय ही बचत खात्यांमध्ये सर्वात जास्त मिनिमम बॅलन्स ठेवणारी बँक ठरली आहे.
आणखी काय बदल होणार?
- बँकेनं रोख व्यवहारांवरील सेवा शुल्कातही बदल केला आहे. जर तुम्ही शाखेत किंवा मशीनद्वारे रोख रक्कम जमा केली तर ३ व्यवहारांनंतर प्रत्येक व्यवहारावर १५० रुपये शुल्क आकारलं जाईल. रोख रक्कम काढण्यासाठी देखील असेच शुल्क आकारलं जाईल.
- बँक बंद होण्याच्या वेळेत म्हणजे दुपारी ४.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी, जर एका महिन्यात एकूण व्यवहार १०,००० रुपयांपेक्षा जास्त झाले तर मशीनद्वारे रोख रक्कम जमा करण्यासाठी प्रति व्यवहार ५० रुपये शुल्क आकारलं जाईल.
- मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा महानगरांमधील नॉन-आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधील व्यवहारांसाठी बँक महिन्यातील पहिल्या तीन व्यवहारांनंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी २३ रुपये आणि प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी ८.५ रुपये आकारेल. ही मर्यादा एकूण आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी लागू असेल.
- हे नवीन नियम १ ऑगस्ट २०२५ पासून उघडलेल्या खात्यांवर लागू होतील. या नियमानंतर, खातेधारकांना त्यांच्या खात्यात पूर्वीपेक्षा जास्त पैसे ठेवावे लागतील. जर असं केलं नाही तर त्यांच्यावर दंड आकारला जाऊ शकतो.