Join us  

सणासुदीपूर्वी HDFC चा ग्राहकांना पुन्हा एकदा झटका, व्याजदर वाढवले; होमलोन, कार लोन महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 4:07 PM

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं सणासुदीपूर्वीच ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.

HDFC Home Loan Interest Rate: देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं सणासुदीपूर्वीच ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. एचडीएफनं काही मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ जाहीर केलीये. बँकेनं एमएलसीआर (MCLR) १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढवलाय. बँकेचा एमएलसीआर वाढवल्यानं गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनचा EMI वाढेल. सणासुदीपूर्वीच आता एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार आहे.

नवे दर झाले लागूएमएलसीआर निश्चित करताना अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात. यामध्ये डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो बनवण्याच्या कॉस्टचा समावेश असतो. रेपो दरात बदलांचा परिणाम एमएलसीआर रेटवर पडतो. एमएलसीआर वाढल्यानं त्याचा परिणाम कर्ज घेणाऱ्यांवर होतो आणि त्यांचा ईएमआय वाढतो. एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार नवे एमएलसीआर दर ७ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आलेत.काय आहेत नवे दर

  • एचडीएफसी बँकेचा ओव्हरनाइट एमएलसीआरमध्ये १० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून तो आता ८.६० टक्के झालाय.
  • एका महिन्याच्या एमएलसीआरमध्ये १५ बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आलीये. यानंतर तो ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के झाला.
  • तीन महिन्यांच्या एमएलसीआरमध्ये १० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून तो ८.८० टक्के झालाय.
  • सहा महिन्यांच्या एमएलसीआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून तो ९.१० टक्के झालाय.
  • एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी एमएलसीआर ९.२० टक्के करण्यात आला. तर दोन आणि तीन वर्षांच्या एमएलसीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून तो अनुक्रमे ९.२० आणि ९.३० टक्के आहे.

एमएलसीआरमध्ये वाढ केल्यानं होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनसह याच्याशी निगडीत सर्व प्रकारची लोन महागणार आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीच्या तुलनेत अधिक ईएमआय द्यावा लागेल.

टॅग्स :एचडीएफसी