Join us

सरकारी बँकांनी ९ महिन्यांत कमावला रेकॉर्ड ब्रेकिंग नफा; आकडे पाहून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:40 IST

Govt. Bank Record Breaking Profit: बँकांची निव्वळ नफा वाढ आणि मालमत्तेची गुणवत्ता खूप चांगली आहे. त्याचबरोबर पुरेसा भांडवली बफर असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Govt. Bank Record Breaking Profit : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांचा निव्वळ नफा ३१.३ टक्क्यांनी वाढून १,२९,४२६ कोटी रुपये झालाय. या कालावधीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा आहे. अर्थ मंत्रालयानं एका निवेदनात म्हटल्यानुसार आलोच्य कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एकूण २,२०,२४३ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा झाला. या बँकांची निव्वळ नफा वाढ आणि मालमत्तेची गुणवत्ता खूप चांगली आहे. त्याचबरोबर पुरेसा भांडवली बफर असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

एकूण व्यवहार २४२.२७ कोटी रुपये

मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी वार्षिक आधारावर ११ टक्के व्यवसाय वृद्धी नोंदवली असून एकूण ठेवींमध्ये ९.८ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण व्यवसाय २४२.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय. या बँकांनी १२.४ टक्के कर्ज वाढ नोंदविली. यामध्ये किरकोळ कर्जांमध्ये १६.६ टक्के, कृषी कर्जांमध्ये १२.९ टक्के आणि एमएसएमईच्या कर्जांमध्ये १२.५ टक्के वाढ झाली आहे.

सरकारी बँका उत्तम स्थितीत

कृषी, एमएसएमई आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावर विशेष भर देत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं पुरेसं भांडवल आहे आणि अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांच्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी ते चांगल्या स्थितीत आहेत, असं मंत्रालयानं म्हटलंय. धोरणात्मक आणि प्रक्रियात्मक सुधारणांमुळे कर्जाची शिस्त, स्ट्रेस्ड असेट्सची ओळख आणि निराकरण, चांगलं प्रशासन, वित्तीय समावेशन उपक्रम आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी चांगली प्रणाली विकसित झाली आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

टॅग्स :बँकसरकार