Join us

SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! तुमचा EMI होणार स्वस्त, दरमहा किती कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 10:41 IST

SBI Home Loan Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पॉलिसी रेपो रेट २५ बेसिस पॉईंटने कमी करून ६.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.

SBI Home Loan Rate : यंदाच वर्ष सुरुवातीपासून मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारं ठरलं आहे. आधी अर्थसंकल्पात मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केलं. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज दिली आहे. एसबीआयने गृहकर्जाच्या व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात केली आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) २५ bps ने कमी केले आहेत. हे नवीन दर १५ फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पॉलिसी रेपो दर २५ बेसिस पॉइंटने कमी करुन ६.२५ टक्के केले आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात केली. EBLR आणि RLLR मधील कपातीचा थेट फायदा अशा ग्राहकांना मिळेल ज्यांची कर्जे या दरांशी जोडलेली आहेत. व्याजदरात घट झाल्यामुळे कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कमी होऊ शकतो किंवा कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो.

एसबीआयने १ ऑक्टोबर २०१९ पासून फ्लोटिंग रेट होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) शी जोडले होते. आता हा दर ०.२५% ने कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. RLLR मधील ०.२५% कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांची कर्जे थेट RBI रेपो रेटशी जोडलेली आहेत.

ईबीएलआर म्हणजे काय?ईबीएलआर म्हणजे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. सर्व फ्लोटिंग रेट होम लोनचे व्याजदर बाह्य बेंचमार्कशी जोडलेले आहेत. पूर्वीचा ईबीएलआर ९.२५% + CRP + BSP जो ८.९०% + CRP + BSP वर सुधारित करण्यात आला आहे. ईबीएलआर ०.२५% ने कमी केला आहे. याचा अर्थ EBLR लिंक्ड कर्जे (जसे की गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्जे) असलेल्या कर्जदारांना कमी व्याजदराचा फायदा होईल. अशा ग्राहकांच्या कर्जाचा हप्ता स्वस्त होईल.

तुमचा ईएमआय किती कमी होणार? समजा तुम्ही SBI कडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले असून सध्या तुम्हाला ९.१५% दराने व्याज द्यावे लागत आहे. २० वर्षांचा कालावधी असलेल्या कर्जाचा मासिक ईएमआय ४५,४७० रुपये असेल. तर आता बँकेने व्याजदर ८.९०% पर्यंत कमी केल्याने तुमचा ईएमआय ४४,६६५ रुपये होईल. 

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र