Join us

EMI Penalty Fee: कर्जाचा ईएमआय थकला तर पेनल्टी बंद होणार?; आरबीआय लवकरच ड्राफ्ट जारी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:10 IST

सरासरी सर्वच बँका हप्ता थकला की त्यावर पेनल्टी म्हणून वार्षिक व्याजाच्या तुलनेत १ ते २ टक्के दंड आकारतात. तो किती असतो ते समजत नाही.

महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ केली आहे. यामुळे आता कर्ज घ्यायचे की थांबायचे या टेन्शनमध्ये लोक असताना आरबीआय या ग्राहकांना मोठा दिलासा देण्याचा प्लॅन आखत आहे. आरबीआयने गेल्या वर्षभरात सहावेळा रेपो रेट वाढविला आहे. यामुळे आता कर्जाचा ईएमआयही वाढणार आहे. असे झाल्यास महिन्याचे गणित बिघडून हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे ईएमआय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे हे लोक ठरलेल्या वेळेत हप्ते देऊ शकतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे जर हप्ता थकला तर बँका जो फाईन लावतात तोच बंद केला तर अशा विचारात आरबीआय आहे. असे झाल्यास वाढलेल्या ईएमआयने त्रस्त झालेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

सरासरी सर्वच बँका हप्ता थकला की त्यावर पेनल्टी म्हणून वार्षिक व्याजाच्या तुलनेत १ ते २ टक्के दंड आकारतात. जर आरबीआयने हा निर्णय घेतला तर दिलासा मिळणार आहे. आरबीआयनुसार बँका ज्या प्रकारे दंड आकारतात त्याची संपूर्ण माहिती वेगळी द्यावी लागणार आहे. हा दंड आताच्या पद्धतीने नाही तर वेगळ्या पद्धतीने आकारावा लागणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार ईएमआयवरील लेट फी पारदर्शक पद्धतीने वसुल केली जाणार आहे. आरबीआयने ८ फेब्रुवारीला मॉनिटरी पॉलिसीच्या बैठकीत याबाबत लवकरच एक ड्राफ्ट गाईडलाईन तयार केली जाणार असल्याचे म्हटले होते. यावर सर्वांची प्रतिक्रिया मागविली जाणार आहे. कोणताही दंड पीनल इंटरेस्टच्या रुपात वसुल केला जाणार नाही. सध्या दंड या प्रकारे वसूल केला जातो. तो कर्जाच्या मुळ रकमेसोबत जोडला जातो. यामुळे तो नेमका किती आकारला गेला ते समजत नाही.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र