Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुख विकत घेताना कर्जाच्या जाळ्यात तर अडकणार नाही ना? स्वतःला विचारा 'हे' महत्त्वाचे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:05 IST

उधारीवर उधळपट्टी अन् हप्त्यांमुळे खिसा रिकामा! स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज आहेच, पण त्याचा अतिवापर कशाला? 

चंद्रकांत दडसलोकमत न्यूज नेटवर्क 

सण-उत्सव, नवीन वस्तू आणि चकाचक जीवनशैली कोणाला आवडत नाही? पण ही स्वप्ने जेव्हा स्वतःच्या कमाईतून नाही, तर कर्जाच्या पैशातून पूर्ण केली जातात, तेव्हा ती सुखाऐवजी चिंतेचे कारण ठरू शकतात. दिखाऊपणाच्या स्पर्धेत तुम्ही कर्ज घेऊन उतरणार असाल तर मात्र तुम्ही आगीत पडण्यासारखेच आहे.

एका अहवालानुसार, महाराष्ट्र हा पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन, ऑटो लोन, घरगुती उपकरण कर्ज घेण्यात देशात सर्वात आघाडीवर असून, हे कर्ज गेल्या वर्षाच्या तुलनेत किमान १० टक्के अधिक घेतले गेले आहे. सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाणही तब्बल ५० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे आपण कर्ज घेताना आपली खरेच गरज आहे का आणि ते कर्ज फेडण्याची ऐपत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.

कर्ज विळख्यातून बाहेर पडण्याचे ५ मार्ग कोणते?

१. कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी स्वतःला विचारा - या वस्तूशिवाय माझे अडणार आहे का?२. सोने ही आपली शेवटची शिदोरी असते. सण साजरा करण्यासाठी किंवा चैनीसाठी सोने गहाण ठेवणे म्हणजे आपल्या आर्थिक पायाला स्वतःच सुरुंग लावण्यासारखे आहे.३. अचानक येणाऱ्या संकटासाठी किमान सहा महिन्यांच्या खर्चा इतकी रक्कम बाजूला ठेवा.४. ‘इन्स्टंट लोन’ ॲप्सपासून दूर राहा५. ५०/३०/२० चा सुवर्ण नियम पाळा

६९,००० रुपये इतके सरासरी पर्सनल लोन भारतीयांनी घेतले आहे.

कर्जाचे डोंगर, रिकामे खिसे

महाराष्ट्रात पर्सनल लोनच्या जाळ्यात अनेक तरुण अडकले असून त्यांच्या पगारापेक्षा त्यांचा ईएमआय अधिक आहे. 

ग्रामीण भागात तर कर्ज देणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक लहानसहान गोष्टींसाठी कर्ज घेताना दहा वेळा विचार करायला हवा.

एक प्रश्न स्वतःला विचारावा की कर्ज घेतले नाही, तर माझे आयुष्य थांबेल का? याचे उत्तर ‘नाही’ असेल, तर कर्ज टाळणे शहाणपणाचे. 

क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर

१. महाराष्ट्रात ५१ हजार कोटी रुपयांचे कर्ज क्रेडिट कार्डवरून घेतले गेले असून, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या वापराबाबत सध्या लोकांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून येते. 

२. ३.४ लाख कोटी रुपयांचे क्रेडिट कार्ड भारतीयांनी घेतले आहे. उत्तर प्रदेशमध्ये क्रेडिट कार्डवर कर्ज घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी देशभरात नवीन क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

१६.२ लाख कोटी रुपयांची थकबाकी सोन्यावरील कर्जाची आहे.

१.९ लाख रुपये सरासरी कर्ज सोन्यावर घेतले जात आहे. यात मागील वर्षांत मोठी वाढ झाली आहे.

पर्सनल लोनच्या जाळ्यात कोण अडकले?

१. महाराष्ट्रात डिसेंबर २०२५च्या तिमाहीत १९१.९ हजार कोटी रुपयांचे पर्सनल लोन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ११.६ टक्क्यांनी वाढ झाली. यापाठोपाठ तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राज्यस्थान, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो. 

२. प्रमुख १० राज्यांचा पर्सनल लोनमध्ये ७० टक्के वाटा आहे. पर्सनल लोन घेतले असले तरी लोक सध्या ते कसे फेडायचे याचा विचार करत आहेत. त्यामुळे हप्ते थकवणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २.६ टक्के तर देशपातळीवर २.५ टक्के इतके आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Before buying happiness on credit, ask yourself these key questions.

Web Summary : Maharashtra leads in personal loans. Consider if borrowing is necessary and affordable. Avoid instant loan apps and impulsive gold pawning. Follow the 50/30/20 rule for financial stability. Credit card usage requires caution to avoid debt traps.