Join us

नववर्षात कार घेण्याचं स्वप्न आणखी खिसा कापणार; SBI, BOB, युनियन बँकेचा ग्राहकांना मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 10:17 IST

नवीन वर्ष सुरू होताच अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

Car Loan: नवीन वर्ष सुरू होताच अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकांनी किरकोळ कर्जावरील (पर्सनल लोन, कार लोन) व्याजदर वाढवले ​​आहेत. मात्र, या निर्णयाचा गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होणार नाही. साधारणपणे असं दिसून येतं की रेपो दरात बदल झाल्यानंतरच बँका मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) वाढवतात. मात्र यावेळी तसं झालेलं नाही. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ज्या बँकांनी व्याजदर वाढवले ​​आहेत त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचाही (SBI) समावेश आहे.

किती आहे व्याजदर?स्टेट बँक ऑफ इंडिया आता अधिक सिबिल स्कोअर असलेल्या लोकांकडून वाहन कर्जावर ८.८५ टक्के व्याज आकारत आहे. पूर्वी तो ८.६५ टक्के होता. त्याचवेळी बँक ऑफ बडोदानं वाहन कर्जावरील दर ८.७ टक्क्यांवरून ८.८ टक्के केला आहे. यासोबतच आता प्रोसेसिंग फीदेखील आकारली जात आहे. सणासुदीच्या कालावधीत बँक ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आकारत नव्हती.

युनियन बँकेबद्दल सांगायचं तर, येथे वाहन कर्ज आता ९.१५ टक्के दरानं मिळेल. तर यापूर्वी बँक वाहन कर्जासाठी ८.७५ टक्के व्याजदर आकारत होती. IDFC फर्स्ट बँकेनं पर्सनल लोनवरील व्याजदर १०.४९ टक्क्यांवरून १०.७५ टक्के केला आहे. कर्नाटक बँकेबद्दल सांगायचं झालं तर आता पर्सनल लोनसाठी आता १४.२८ टक्के व्याज आकारलं जाईल. यापूर्वी बँक पर्सनल लोनवर १४.२१ टक्के व्याज आकारत होती.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाबँक