Join us

अनिल अंबानींचा पाय आणखी खोलात! SBI नंतर बँक ऑफ इंडियानेही कर्ज खात्याला म्हटलं 'फ्रॉड', काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:04 IST

Reliance Communications fraud case : स्टेट बँक ऑफ इंडियानंतर, बँक ऑफ इंडियानेही रिलायन्स कम्युनिकेशन्सचे कर्ज खाते फसवे असल्याचे घोषित केले आहे. यामध्ये अनिल अंबानी यांचेही नाव आहे.

Reliance Communications fraud case : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. भारतीय स्टेट बँकेनंतर, आता बँक ऑफ इंडियानेही दिवाळखोर झालेल्या रिलायन्स कॉम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्याला 'फ्रॉड' म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणात बँकेने कंपनीचे माजी संचालक अनिल अंबानी यांचे नावही घेतले आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत बँक ऑफ इंडियाने २०१६ मध्ये कथितपणे पैशांच्या अफरातफरीचा उल्लेख केला आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कॉम्युनिकेशन्सला चालू भांडवली आणि कार्यान्वयन खर्चासाठी तसेच सध्याच्या देयतांच्या पूर्ततेसाठी ७०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

नेमका प्रकार काय?रिलायन्स कॉम्युनिकेशन्सने शेअर बाजाराला दिलेल्या पत्रात बँक ऑफ इंडियाने केलेल्या आरोपांबद्दल सांगितले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये वितरित केलेल्या ७०० कोटी रुपयांच्या मंजूर कर्जापैकी अर्धी रक्कम (३५० कोटी) एका एफडीमध्ये गुंतवली होती, ज्याची कर्जाच्या अटींनुसार परवानगी नव्हती.

रिलायन्स कॉम्युनिकेशन्सने सांगितले की, त्यांना २२ ऑगस्ट रोजी बँक ऑफ इंडियाचे ८ ऑगस्टचे पत्र मिळाले, ज्यात 'कंपनी, अनिल अंबानी (कंपनीचे प्रवर्तक आणि माजी संचालक) आणि मंजरी अशोक कक्कर (कंपनीची माजी संचालक) यांच्या कर्ज खात्याला फसवणूक म्हणून वर्गीकृत' करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

एसबीआयच्या तक्रारीनंतर सीबीआयची कारवाईयापूर्वी, जूनमध्ये भारतीय स्टेट बँकेने (SBI) देखील रिलायन्स कॉम्युनिकेशन्सवर कर्जाच्या अटींचे उल्लंघन करून पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप लावला होता. एसबीआयच्या तक्रारीनंतर सीबीआयने शनिवारी रिलायन्स कॉम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्या निवासस्थानाशी संबंधित परिसरांची झडती घेतली. सीबीआयनुसार, रिलायन्स कॉम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्या कथित गैरव्यवहारामुळे एसबीआयला २९२९.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाचा - बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा

या सर्व आरोपांवर अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सर्व आरोप फेटाळले आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, 'एसबीआयने दाखल केलेली तक्रार १० वर्षांपेक्षा अधिक जुन्या प्रकरणांशी संबंधित आहे. त्यावेळी अनिल अंबानी हे कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते आणि कंपनीच्या दैनंदिन कामकाजात त्यांची कोणतीही भूमिका नव्हती.'

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स कम्युनिकेशनबँक ऑफ इंडियास्टेट बँक आॅफ इंडिया