Join us

RBIनं रेपो दर कमी केल्यानंतर ६ बँकांनी स्वस्त केलं Home Loan, पाहा तुमची बँक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:47 IST

Home Loan Interest Rate: आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी गृहकर्जाचे व्याज कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता देशातील ६ मोठ्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.

Home Loan Interest Rate: आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी गृहकर्जाचे व्याज कमी करण्यास सुरुवात केली आहे. आता देशातील ६ मोठ्या बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.२५% कपात केली. त्यामुळे तो ६.२५ टक्क्यांवर आला. गेल्या दोन वर्षांत हा दर स्थिर होता. आता त्यात कपात करण्यात आली आहे.

तेव्हापासून बँका गृहकर्जाचे दर कमी करतील, अशी अपेक्षा बहुतांश गृहकर्ज खरेदीदारांना होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर देशातील ६ बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा सह अनेक बँकांनी आपल्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये ०.२५% कपात केली आहे.

रेपो लिंक्ड लेडिंग रेट म्हणजे काय?

रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजे बँका ज्या दरानं ग्राहकांना कर्ज देतात. हा दर थेट आरबीआयच्या रेपो दराशी निगडित आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये आरबीआयनं एक परिपत्रक जारी करून बँकांना त्यांचे रिटेल लोन बाह्य बेंचमार्क दराशी (E-BLR) जोडण्याचे निर्देश दिले होते. यामुळे बहुतांश बँकांसाठी रेपो दर हा मुख्य बेंचमार्क बनला आहे. आरबीआयच्या रेपो दरातील बदलानुसार आरएलएलआरशी जोडलेल्या गृहकर्जाची निवड करणाऱ्या ग्राहकांच्या व्याजदरात चढ-उतार किंवा वाढ होत असते. बहुतेक ग्राहक फ्लोटिंग रेट होम लोन घेतात, जे आरएलएलआरशी जोडलेले असतात. आता ग्राहकांना एकतर आपला ईएमआय कमी करण्याचा किंवा कर्जाचा कालावधी कमी करण्याचा पर्याय आहे.

किती झाले नवे दर?

कॅनरा बँक - कॅनरा बँकेनं आपला आरएलएलआर ९.२५ टक्क्यांवरून ९.०० टक्क्यांवर आणला आहे. हा नवा दर १२ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल आणि केवळ १२ फेब्रुवारी २०२५ रोजी किंवा त्यानंतर उघडलेल्या खात्यांनाच लागू होईल किंवा आरएलएलआर प्रणालीमध्ये ३ वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना हा दर लागू होईल.

बँक ऑफ बडोदा - बँक ऑफ बडोदाने आपला बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (बीआरएलएलआर) ८.९०% पर्यंत कमी केलाय, जो १० फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्यात आलाय.

बँक ऑफ इंडिया - बँक ऑफ इंडियानं आरएलएलआर ९.३५ टक्क्यांवरून ९.१० टक्क्यांवर आणला आहे. हा दर ७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झालाय.

युनियन बँक ऑफ इंडिया - युनियन बँक ऑफ इंडियानं आरएलएलआर ९.२५ टक्क्यांवरून ९.०० टक्क्यांवर आणला आहे. हा दर ११ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झालाय.

इंडियन ओव्हरसीज बँक - इंडियन ओव्हरसीज बँकेनं (IOB) आपल्या आरएलएलआरमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली असून तो ९.३५ टक्क्यांवरून ९.१० टक्क्यांवर आणला आहे. हा बदल ११ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झालाय.

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) - पीएनबीनंही आपला आरएलएलआर ९.२५ टक्क्यांवरून ९.०० टक्क्यांवर आणलाय. हा दर १० फेब्रुवारी २०२५ पासून लागू झालाय.

गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांच्या आरएलएलआरमध्ये कपात केल्यानं गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे नवीन गृहकर्ज स्वस्त होईल आणि विद्यमान ग्राहकांचा ईएमआय कमी होऊ शकेल. ग्राहक एकतर आपला ईएमआय कमी करू शकतात किंवा कर्जाचा कालावधी कमी करून व्याज वाचवू शकतात.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक