Join us  

१० दिवसांत ३ बँकांनी वाढवले व्याजदर, खिशावर भार; आता जास्त भरावा लागणार EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 3:33 PM

Loan Rates September 2023: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केली नसली तरी गेल्या काही दिवसांमध्ये काही बँकांनी मात्र व्याजदर वाढवले आहेत.

Loan Rates September 2023:  कोरोना महासाथीदरम्यान रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँका आणि वित्तीय संस्थांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. परंतु नंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केली आणि पुन्हा एकदा बँकांनी व्याजदर वाढवले. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दर जैसे थे ठेवल्यानंतरही काही बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली आहे. सप्टेंबर महिन्यात काही मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली. 

1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान देशातील 3 मोठ्या बँकांनी गृहकर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे, कर्जदारांना जास्त मासिक हप्त्यांचा भार सहन करावा लागू शकतो. तर नव्यानं कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना महागड्या दरानं कर्ज घ्यावं लागणार आहे. पाहूयात कोणत्या बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत.

आयसीआयसीआय बँकखाजगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेनं सर्व कालावधीसाठी एमएलसीआर 5 bps ने वाढवला आहे. ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट आणि एक महिन्याचा एमएलसीआर दर 8.40 टक्क्यांवरून 8.45 टक्के झाला आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांचा एमएलसीआर अनुक्रमे 8.50 टक्के आणि 8.85 टक्के झाला आहे. एक वर्षाचा एमएलसीआर 8.90 टक्क्यांवरून 8.95 टक्के करण्यात आलाय.

पंजाब नॅशनल बँकपंजाब नॅशनल बँकेनं (PNB) सप्टेंबर महिन्यात एमएलसीआर दर 5 बेसिस पॉईंटनं वाढवले ​​आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाइट दर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याचा एमएलसीआर दर 8.20 टक्क्यांवरून 8.25 टक्के झाला आहे. पीएनबीमध्ये, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर अनुक्रमे 8.35 टक्के आणि 8.55 टक्के करण्यात आला आहे. एका वर्षाचा एमएलसीआर आता 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्के झाला आहे. तर तीन वर्षांचा एमएलसीआर वाढीनंतर 8.95 टक्के झाला.

एचडीएफसी बँकदेशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीनं (HDFC) आपल्या ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर महाग केले आहेत. 7 सप्टेंबरपासून, बँक ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या काही निवडक कर्जांवर अधिक व्याज द्यावे लागेल. एचडीएफसी बँकेच्या ओव्हरनाइट एमएलसीआरमध्ये 15 bps च्या वाढीनंतर, तो 8.35 टक्क्यांवरून 8.50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एका महिन्याचा एमएलसीआर 0.10 टक्क्यांनी वाढला असून तो 8.45 टक्क्यांवरून 8.55 टक्क्यांवर पोहोचला आहे. तीन महिन्यांचा एमएलसीआर 10 बेसिस पॉईंट्सनं वाढला असून तो 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्क्यांवर पोहोचलाय. सहा महिन्यांचा एमएलसीआर 10 बेसिस पॉईंट्सनं वाढला आहे आणि तो 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्क्यांवर आलाय.

टॅग्स :बँकआयसीआयसीआय बँकएचडीएफसीपंजाब नॅशनल बँक