श्वान समाजाचा अविभाज्य घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:28 IST2018-04-08T00:28:29+5:302018-04-08T00:28:29+5:30
भटक्या श्वानांबाबत समाजात गैरसमजुती मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सरासरी १ हजार रुग्णांपैकी १ रुग्ण श्वानदंशामुळे दाखल झालेला असतो.

श्वान समाजाचा अविभाज्य घटक
- फ्रेयान भठेना
भटक्या श्वानांबाबत समाजात गैरसमजुती मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सरासरी १ हजार रुग्णांपैकी १ रुग्ण श्वानदंशामुळे दाखल झालेला असतो. तर दुसरीकडे प्राण्यांच्या रुग्णालयांमध्ये पाहिले तर तेथे उपचार घेत असलेल्या श्वानांपैकी ९९ टक्के श्वान हे मानवी अत्याचाराला बळी पडलेले आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने हिट अॅण्ड रन, दगड मारल्यामुळे जखमी झालेले, अमानवी कृत्याला बळी पडलेले श्वान मोठ्या प्रमाणात आढळतात. दररोज मुंबईत शेकडो श्वान अमानवी कृत्याला बळी पडतात.
मानव जीवन जगत असताना स्वत:चे संरक्षण करतो. निसर्गाचा हा नियम प्राण्यांनाही लागू होतो. अमानवी कृत्य पाहिल्यानंतर, श्वानाच्या डोळ्यांत पाहिल्यानंतर श्वान बिथरतात. त्यामुळे प्रतिकारासाठी श्वान भुंकू लागतात, अनेकदा हल्ले करतात. स्वत:चे संरक्षण करणे हे मानवांसह सर्वच प्राण्यांच्या डीएनएमध्येच असते. श्वान ज्या परिसरात राहतात, त्या परिसरातील उंदीर, घुशी आणि इतर दुर्गंधी व रोगराई पसरविणाऱ्या प्राण्यांना श्वान खाऊन परिसराला रोगराईपासून दूर ठेवतात. लोकांमध्ये असलेल्या शिक्षणाचा अभाव, माहितीच्या अभावामुळे अनेकदा लोक श्वानांना डिवचतात, मारतात. त्यामुळे श्वान स्वसंरक्षणासाठी, लोकांवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त होतात.
प्रत्येकाने आपल्या मुलांना भूतदया शिकवायला हवी. माणसांसह प्राण्यांबाबतही प्रेम आणि आदर बाळगण्याचे संस्कार करायला हवेत. प्राण्यांसाठी विशेष कायदा आहे. प्रिव्हेन्शन आॅफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट, १९६०नुसार प्राण्यांना मारणे, छळ करणे, अमानवी कृत्य करणे अशा कृत्यांसाठी दंड अथवा तुरुंगवास भोगावा लागेल, अशी व्यवस्था या कायद्यात करण्यात आली आहे. मुंबई महापालिका भटक्या कुत्र्यांची संख्या व माहिती जमविण्यात अपयशी ठरली आहे. प्राण्यांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राणिप्रेमी व नागरिकांना प्रशासनापेक्षा स्वयंसेवी संस्थांवर जास्त विश्वास आहे. अनेक स्वयंसेवी संस्था प्राण्यांविषयी जागरूकतेची कामे करण्यात यशस्वी झाल्या आहेत. वर्ल्ड फॉर आॅल ही संस्था याचेच एक उदाहरण आहे. ही संस्था मुंबईत नगरसेवक, झोपडपट्ट्या, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये श्वानांबाबत जनजागृती करते. भटक्या श्वानांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण देते.
मानव आणि प्राण्यांमधील या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंनी प्रतिकार केला जात आहे. मानवाकडून हल्ले तर प्राण्यांकडून प्रतिहल्ले होत राहतात. याचे समाज, मानव आणि प्राण्यांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होत राहणार आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी श्वानांची लहान पिल्ले प्लॅस्टिकच्या थैलीत किंवा बॅगेत ठेवून कचºयाच्या डब्यात फेकून दिली जातात, अशी अमानवी कृत्ये थांबायला हवीत. भटक्या श्वानांबाबत नकारात्मक विचार असलेल्या लोकांनी एक वेगळा प्रयोग करून पाहायला हवा. पाच रुपयांचा छोटासा बिस्किटांचा पुडा सलग दोन दिवस एखाद्या भटक्या कुत्र्याला खाऊ घाला. त्यानंतर तो श्वान तुमच्यावर कधीच भुंकणार नाही. याउलट जवळ येईल, जिभेने चाटेल, शेपटी हलवेल.
(लेखक वर्ल्ड फॉर आॅलचे विश्वस्त आहेत.)