Join us

weather alert: राज्यात १६ जिल्ह्यांना पाऊस, उष्णतेच्या लाटेचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 27, 2024 9:49 AM

चक्राकार वाऱ्यांचा विस्कळीत प्रभाव, या भागात पडणार ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेची हजेरी लावली असून नागरिकांना मिश्र हवमानाचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपले. दरम्यान, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाकिस्तानसह आजूबाजूच्या परिसरावर आहे. हे वारे मराठवाडा ते तमिळनाडूपर्यंत विस्कळीत स्वरूपात असल्याने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार आहे.

दरम्यान आज राज्यातील १० जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

आज दि २७ एप्रिल रोजी मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, विदर्भात यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उष्णतेची लाट कुठे?

कोकण किनारपट्टीवर उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा अंदाज देण्यात आला असून सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. सिंधूदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पालघर या चार जिल्ह्यांमध्ये उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून ठाणे, रायगड मध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पुढील चार दिवस या सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याचा अंदाजही यावेळी हवामान विभागाने  दिला.

टॅग्स :पाऊसतापमानहवामानवनविभाग