Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या थंडीची तऱ्हाच निराळी! पहाटे हुडहुडी दुपारी घामाच्या धारा

By मुक्ता सरदेशमुख | Updated: December 12, 2023 19:00 IST

काल कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ३५.५ अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.​​​​​​​

राज्यात आता थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी तापमान ३५ अंशांपर्यंत जात आहे. किमान तापमानात घसरण दिसत असली तरी कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे.  काल कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ३५.५ अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.राज्यात अवकाळी पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळाचा प्रभाव अशा टोकाच्या घटनांचा तापमान आणि वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. राज्यात एकीकडे दुष्काळ पहाणी दौरे सुरू आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईसाठीची शेतकऱ्यांची धडपड! मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम आता ओसरला आहे. राज्यात पुढील सात दिवस कोरडे वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. किमान तापमानाचा पारा घसरत आहे. मात्र, कमाल तापमानात वाढ होत असल्याने सकाळी हुडहुडी आणि दुपारी घामाच्या धारा अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.काल (दि-११) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमान साधारण तापमानाच्या तुलनेत अधिक असल्याचे हवामान विभागाने सांगितले. मराठवाड्यात सरासरी तापमानाची नोंद करण्यात आली.  आज  साधारण तापमानाच्या तुलनेत काही ठिकाणी १ अंशांपर्यंतची घसरण होण्याचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, महाबळेश्वर रत्नागिरी, सातारा सांगली, सोलापूर जिल्ह्यात १ ते ३ अंशांची वाढ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी १५.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात सकाळी १४ अंश सेल्सियस तापमान होते. अहमदनगर जिल्ह्यातही १४.३ अंश तापमान नोंदवले गेले. राज्यातील तापमानात साधारण तापमानाच्या २ ते ३ अंशांची वाढ दिसून येत आहे.

टॅग्स :तापमानहवामान