Join us

आणि ‘लोकमत ॲग्रो’ने दिलेला भुकंप अंदाज ठरला खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 14:15 IST

उत्तर भारतासह महाराष्ट्रावर भूकंप ढगांची व धुक्याची निर्मिती होत असून येत्या काळात हिमालयाच्या पायथ्याशी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आदी प्रदेश तसेच उत्तर भारतात जनतेला भूकंपाचा सामना करावा लागणार आहे.

उत्तराखंडला सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९च्या सुमारास ४ भूकंपाचे सौम्य हादरे बसले. राष्ट्रीय भुकंपमापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील पिठोरगड परिसरात भुकंपाची नोंद भूकंपमापकावर झाली.

उत्तर भारतासह महाराष्ट्रावर भूकंप ढगांची व धुक्याची निर्मिती होत असून येत्या काळात हिमालयाच्या पायथ्याशी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आदी प्रदेश तसेच उत्तर भारतात जनतेला भूकंपाचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा  घाबरून न जाता व अफवा न पसरवता सावधतेने तयार रहाणे आवश्यक आहे, असा इशारा ‘लोकमत ॲग्रो’च्या ‘किकुलॉजी’ सदरातून दिनांक १० ऑक्टोबर रोजी देण्यात आला होता. उत्तराखंडच्या भूकंपामुळे तो वास्तवात आला आहे.

किकुलॉजी : महाराष्ट्रासह उत्तर भारतावर 'भूकंपाचे ढग आणि धुके’

शेतकऱ्यांमध्ये हवामान विषयक जागृती होण्यासाठी प्रा. किरणकुमार जोहरे यांचे ‘किकुलॉजी’ हे सदर लोकमत ॲग्रोवर नियमित सुरू असते. प्रा. जोहरे हे इलेक्ट्रॉनिक्स सायन्सचे प्राध्यापक आहेत. तसेच भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरीऑलॉजीचे इन्स्ट्रूमेंटेमेशन अँड ऑब्झरवेशनल टेक्निक (आय अँड ओटी) विभागाचे माजी शास्त्रज्ञ आहेत. प्रा. जोहरे हे मागील ३० वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करत आहे. मॉन्सूनबरोबरच भूकंप, ढगफुटी हवामानात होणारे बदल असे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यावर ते शेतकरी व सामान्यांना नियमित मार्गदर्शनही करत असतात. 

यापूर्वीही त्यांनी  दि. २१ जुलै २०२३ रोजी पुढील ३० दिवसांच्या आत उत्तर भारताला ५ रिश्टर स्केल पेक्षा जास्त मोठा भुकंपाचा धक्का बसणार आहे, अशी भुकंप भविष्यवाणी त्यांनी केली होती. ५ ऑगस्ट २०२३ रोजी बरोबर १५ दिवसांनी रात्री साडे नऊ वाजता ५.८ रिश्टर स्केलच्या धक्काने उत्तर भारत हादरल्याने ती खरी ठरली होती.

प्रा. जोहरे यांनी स्वतः तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या सहाय्याने शोधलेल्या ईक्यू क्लाऊड (भुकंप ढग)च्या माहितीचा वापर नैसर्गिक बुद्धिमत्ता (एनआय) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरत भुकंपाचा  इशारा दिला होता.तापमान चढ उतार आणि जमिनीखाली टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने बाष्प वाढते आहे. परिणामी धुके आणि विविध प्रकारच्या भुकंप ढगांची निर्मिती होत आहे. सध्या महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतात देखील भूकंप ढगांची आणि धुक्याची निर्मिती होत आहे. येत्या काळात ४ ते ८ रिश्टर स्केल भूकंपाचा सामना भारताला करावा लागणार आहे.

त्यामुळे प्रशासनासह समन्वयाने एकजुटीने  'टिमवर्क'साठी आपत्कालीन व्यवस्था, नागरी संरक्षण दल, एनएसएस, एनसीसी पथकं आदींनी देखील तयार राहणे आवश्यक आहे. अनेकदा भूकंपाचे एकामागून एक अशी मालिका होते. यामुळे सावधान व सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे, असेही प्रा. जोहरे यांनी ‘लोकमत ॲग्रो’ ला प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.

काल दिनांक १६ ऑक्टोबर रोजीच सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरातही रात्री ११.३० च्या दरम्यान ३.३ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याचे वृत्त असून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात भुकंपाचे धक्के बसण्याची शक्यता प्रा. किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :भूकंपहवामान