Join us

Rain Alert: राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अलर्ट, हवमान विभागाचा अंदाज काय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 25, 2024 9:48 AM

मध्य महाराष्ट्रासह तेलंगणावर चक्राकार वारे सक्रीय, या भागात यलो अलर्ट

चक्राकार वाऱ्यांची स्थिती इराण व आजूबाजूच्या प्रदेशांवर सक्रीय असून मध्य महाराष्ट्रावर घोंगावत आहेत. परिणामी राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, आज मध्य- उत्तर महाराष्ट्रासह मरावाडा व विदर्भ- खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टीच्या भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार आहे.

मध्य महाराष्ट्राकडून विदर्भाकडे जाणाऱ्या पट्ट्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, तापमानात सामान्य तापमानाच्या तुलनेत १ ते २ अंशांची घट झाली असून ढगाळ वातावरण आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आल्यानंतर आज दि २५ रोजी मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, खान्देश विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तापमान वाढणार

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसात महाराष्ट्रात ३ ते ४ अंशांनी तापमानात वाढ होणार असून  पुढील २४ तासांत हळूहळू याला सुरुवात होईल. दरम्यान, काल मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा चढे होते. तर अनेक भागात ४० ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने नोंदवले.

सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या भागात सक्रीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ५० किमी प्रतितास राहण्याची शक्यता असून २५ ते २७ पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची संभावना आहे.

कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण व आर्द्र हवामान राहण्याचा अंदाज हवामान  विभागाने वर्तवला आहे. दरम्यान २३ ते २६ एप्रिल दरम्यान हवमान असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कुठे यलो अलर्ट?

  • कोकण किनारपट्टीवरील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे जिल्ह्याला उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
  • मध्य महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड, जालना जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
  • विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर खान्देशातील जळगाव जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
  • सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव लातूर, परभणी,हिंगोली,नाशिक, धुळे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे. 

तापमान वाढणार

दरम्यान राज्यात तापमानात येत्या चार ते पाच दिवसात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

टॅग्स :पाऊसतापमानहवामानवनविभाग