Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vidarbha Heatwave Alert : दिवसच नाही तर रात्रीही तापल्या; विदर्भात 'हॉट नाईट'चा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:34 IST

Vidarbha Heatwave Alert : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या चार शहरांवर उष्ण लाटेचे संकट घोंघावत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला असून तापमानात आणखी २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी ४५.९ अंश तापमानाची नोंद झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.(Vidarbha Heatwave Alert)

नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या चार शहरांसाठी पुढील २४ तासांपासून उष्ण लाटेचा इशारा दिला आहे.(Vidarbha Heatwave Alert)

सध्याच्या तापमानात पुढील दोन दिवसांत आणखी २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Vidarbha Heatwave Alert)

एप्रिल महिन्यात विदर्भातील अनेक शहरांनी विक्रमी उष्णतेचा सामना केला होता. मे महिन्याच्या सुरुवातीलाही उकाडा कायम राहिला.

काही दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट झाली होती, मात्र ९ मेपासून पुन्हा सूर्य आग ओकू लागल्याने तापमान झपाट्याने वाढू लागले आहे.

अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी ४५.९ अंश

अकोला येथे बुधवारी नोंदवले गेलेले ४५.९ अंश सेल्सिअस तापमान गुरुवारीही कायम राहिले. त्यामुळे अकोला राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये अग्रस्थानी राहिले आहे.

वर्धा येथे तापमानात आणखी वाढ होत ४५.५ अंशांची नोंद झाली. तर अमरावती येथे तापमानात किंचित घट झाली असली तरी पारा ४५.२ अंशांवर कायम आहे. नागपूरमध्ये मागील दोन दिवसांपासून तापमान ४४ अंशांच्या आसपास स्थिर आहे.

राज्यातील सर्वाधिक तापमानाची शहरे

शहरकमाल तापमान
अकोला४५.९° C
वर्धा४५.५° C
जळगाव४५.५° C
अमरावती४५.२° C
नागपूर४४° C

याशिवाय वाशिम, यवतमाळ आणि ब्राह्मपुरी येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली येथे तापमान ४२ अंशांवर पोहोचले आहे. गोंदिया आणि भांडारा येथेही उष्णतेचा जोर कायम आहे.

उष्ण रात्रींचाही वाढता धोका

हवामान विभागाने अकोला आणि वर्धा येथे 'उष्ण रात्र' परिस्थितीचा इशारा दिला आहे. अकोल्यातील किमान तापमान ३१.५ अंश, तर वर्ध्यात ३०.५ अंशांवर पोहोचले आहे. अमरावतीतही रात्री उष्णता वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. रात्री तापमान कमी न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हवामान विभागाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने विदर्भातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी अधिक जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाचा सल्ला

* दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा

* भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या

* हलके व सैल कपडे वापरा

* वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी

* उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या

विदर्भातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरी आणि मजूर वर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला असून पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : सावधान! १५ मेपर्यंत तापमान आणखी वाढणार, IMD चा मोठा इशारा

अधिक वाचा : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Heatwave Alert: Hot Nights Loom as Temperatures Soar

Web Summary : Vidarbha faces a severe heatwave, with Nagpur, Akola, Amravati, and Wardha under alert. Temperatures may rise further. Akola recorded 45.9°C. Hot nights pose health risks. Citizens advised to avoid midday sun and stay hydrated.
टॅग्स :शेती क्षेत्र