Join us

धरण कालव्यांतील पाणी वापरासाठी 28 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:50 IST

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील या सर्व प्रकल्पामध्ये 33 टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना....

नाशिक : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील दारणा, गंगापूर, गौतमी-गोदावरी, कश्यपी, आळंदी, कडवा,  भोजापूर, भावली, मुकणे, वाकी, भाम व वालदेवी या सर्व प्रकल्पांवरील जलाशय नदी तसेच गोदावरी कालवे, गंगापूर (Gangapur Dam) डावा कालवा, कडवा उजवा कालवा, आळंदी उजवा व डावा कालवा, भोजापूर डावा कालवा, पालखेड उजवा कालवा या सर्व प्रकल्पामध्ये 33 टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. 

या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे व रितसर पोहोच घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या (Nashik Patbandhare Vibhag) कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

यावर्षी धरणात जसजसा पाऊस पडून नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल, त्याप्रमाणे शासन व वरिष्ठ कार्यालयाचा जो निर्णय होईल. त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. पाणी पुरवठा करतांना पाऊस कमी झाल्यास किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासल्यास अशावेळी दिलेले परवाने व मंजुरी रद्द करण्यात येईल.

याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही अथवा त्याअनुषंगाने न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. या उपलब्ध होणाऱ्या पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य असणार असून पाण्याची उपलब्धता विचारात घेवून मंजुरी देण्यात येईल.

तसेच प्रकल्पावर व कालव्यावर नमुना नंबर 7 नुसार चे मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात समप्रमाणात कपात करून मंजुरी देण्यात येईल. सहकारी पाणीवापर संस्थेच्या लाभक्षेत्रात नमुना नंबर 7 ची मंजुरी अनुज्ञेय राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनाच्या कायम स्वरूपाच्या मंजुरीस मुदतवाढ  दिली आहे. त्यांनी नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज भरून मागणी करावी.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर करतांना सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा. मा.उच्च न्यायालयात जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याबाबत ज्या जनहित याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार अथवा शासन निर्णयानुसार आवर्तन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

याद्वारे फक्त खरिपाचे मागणीक्षेत्र मागविण्यात येत आहे. आवर्तन कालावधी अथवा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कालवा सोडण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात सूचित करण्यात आले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजलवाहतूकगंगापूर धरण