Join us

remal cyclone किकुलॉजी: दुष्काळाचे खापर चक्रीवादळावर फुटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 4:57 PM

Effect of remal cyclone on monsoon किकुलॉजी भाग २८ : शेतकऱ्यांना हवामान तंत्रज्ञान सजग करणारे सदर

बंगालच्या उपसागरात महाराष्ट्रापासून १ हजार ५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर तयार होत असलेल्या 'रेमल' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कुठलाही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगीचच घाबरून जाऊ नये तसेच सोशल मीडियावरील कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवून इतरांना देखील घाबरवू नये. मात्र दुष्काळ आणि मान्सून पॅटर्न बदलल्यानंतर गायब होणारा पाऊस याचे खापर 'रेमल'वर फोडले जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचाकिकुलॉजी भाग २७: शेतकरी बंधूंनो, एल निनो आणि ला निनातून तुमची कशी दिशाभूल केली जाते

१०६ टक्के मान्सून बरसणार या गृहितकावर विसंबून न राहता आणि शेतकऱ्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या परिस्थितीत पाणी व पैसा वाचवत धैर्याने तोंड देणे गरजेचे आहे. अन्नसुरक्षा व जनावरांचा चारा याबाबत गांभीर्याने धोरणात्मक कृतीकार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.

...असे पडले 'रेमल' नाव! बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल' हे नाव ओमानने सुचवले आहे आणि अरबी भाषेत त्याचा अर्थ 'वाळू' असा होतो. 

येथे होईल‌ पाऊस 'रेमल' चक्रीवादळामुळे वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणानुसार ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होईल. तसेच विजांच्या गडगडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने म्हणजे सायकल जास्तीतजास्त ज्या वेगाने व्यक्ती चालवते त्या वेगाने वारे वाहतील त्यामुळे मच्छीमारांना बंगालच्या उपसागरात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

'रेमल' नंतर 'आसना' 'रेमल' चक्रीवादळ रविवारी २६ मे २०२४ रात्री किंवा सोमवारी २७ मे २०२४ नंतर बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर धडकू शकेल. 'रेमल' चक्रीवादळानंतर आसना, दाना, फेंगल, शक्ति, महिना, सेयर, दितवाह अशी पुढील सात चक्रीवादळांची नावे असतील. विशेष म्हणजे ही सर्व चक्रीवादळांची नावे साधारणतः जून २०२६ पर्यंत आपल्याला पहायला मिळतील.

चक्रीवादळ निर्माण होणे ही संथ नैसर्गिक घटना चक्रीवादळ निर्मिती ही संथ नैसर्गिक घटना आहे. नॅशनल हरिकेन सेंटर नुसार, १९९४ मधील 'जॉन' नावाचे चक्रीवादळने तयार होऊन नष्ट होण्यासाठी ३१ दिवसांचा कालावधी घेतला होता तर  पश्चिमी प्रशांत महासागरात, २०१३ मधील बनलेल्या 'हैयान' या चक्रीवादळाने १३.५ दिवस इतका कालावधी घेतला होता.

मान्सूनवर परिणाम नाही! मान्सून पॅटर्न बदललेला आहे. मात्र मान्सूनवर अशा चक्रीवादळांचा काहीही परिणाम होत नाही, उलट मान्सून संपला किंवा सुरू होण्यापूर्वी वातावरणातील अस्थिरतेमुळे दरवर्षी चक्रीवादळे निर्माण होत असतात, थोडक्यात वादळे ही एकंदर मान्सून सिस्टिमचाच भाग असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी उगीचच घाबरून जाऊ नये. मान्सून ही खूप प्रचंड मोठी एटमॉस्फिअरीक सिस्टिम (वातावरणीय प्रणाली) आहे, जी प्रचंड ऊर्जा घेत तयार होते. तर तुलनेने येणारी चक्रीवादळे ही अत्यंत लहान वायू भोवरे आहेत, ज्यासाठी मोठी ऊर्जा लागते तरीही ती मान्सून पेक्षा अत्यंत कमी व नगण्य ऊर्जा घेतात. 

मान्सूनची सिस्टिम निर्मितीी प्रक्रिया अखंड वर्ष भर घालत असते असे म्हणता येईल. तर चक्रीवादळे ही वातावरणातील अस्थिरतेमुळे निर्माण होत जवळपास ३०० तासांचा सरासरी कालावधी घेत अवघ्या दहा पंधरा दिवसांत नष्ट होतात. परीणामी मान्सूनच्या एकंदर सिस्टिम वर चक्रीवादळांचा काहीही परिणाम होत नाही. उलट चक्रीवादळे ही वातावरणातील अस्थिरतेमुळे पुर्व मान्सून व मान्सून उत्तर काळात बनतात. मान्सून काळात वातावरणात स्थिरता निर्माण झालेली असल्याने  चक्रीवादळ मान्सून काळात कधीच निर्माण होत नाही.

चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला: ३२ टक्के वाढचक्रीवादळांचा पॅटर्न मान्सून पॅटर्न बदलला बरोबरच बदलला असून भारतीय उपखंडात अस्थिरता वाढत असून चक्रीवादळे ही ३२ टक्के वाढली आहेत याचा अधिक गांभीर्याने व सखोलपणे अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे. २०१० ते २०१९ या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे येऊन धडकली. तर  २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा अकरा टक्क्यांनी जास्त आहे. चक्रीवादळांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, १८९१-२००० सालाच्या कालावधीत जवळपास ३०८ उष्णकटिबंधीय चक्रीवादळांनी पूर्व किनारपट्टी ओलांडली. त्यातील १०३ तीव्र होती. पश्चिम किनारपट्टी ओलांडलेल्या ४८ चक्रीवादळांपैकी २४ चक्रीवादळे तीव्र होती. एप्रिल ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे प्रमाण ८० टक्के झाले आहे.

चक्रीवादळांचे विज्ञान आणि नुकसान

  • वाऱ्याचा वेग ताशी १७ ते ३० किलोमीटर असल्यास लघुभार किंवा कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर), 
  • वाऱ्याचा वेग ताशी ३१ ते ३९ किलोमीटर असल्यास कमी दाब (डिप्रेशन), 
  • वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५९ किलोमीटर असल्यास खोल कमी दाबाचे क्षेत्र (डिप डिप्रेशन), 
  • वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८९ किलोमीटर असल्यास चक्रिवादळ (सायक्लोनिक स्ट्रॉम), 
  • वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११९ किलोमीटर असल्यास तीव्र चक्रिवादळ (सिव्हीअर सायक्लोनिक स्ट्रॉम), 
  • वाऱ्याचा वेग ताशी १२० ते २२० किलोमीटर असल्यास अती तीव्र चक्रिवादळ (एक्सट्रीम सिव्हीअर सायक्लोनिक स्ट्रॉम), 
  • वाऱ्याचा वेग ताशी २२० किलोमीटरच्या पूढे असल्यास सुपर सायक्लोन अशा चढत्या क्रमाने विध्वंस वाढत जाणाऱ्या वादळाच्या अवस्था आहेत.

जेव्हा वाऱ्याचा ताशी वेग हा ९० ते १२४ किलोमीटर इतका असतो तेव्हा अत्यंत नाममात्र नुकसान होते, जेव्हा हा ताशी वेग १२५ ते १६४ किलोमीटर तेव्हा लक्षात येण्याइतपत नुकसान होते, जेव्हा हा ताशी वेग १६५ ते २२४ किलोमीटर असते तेव्हा घरांचे छप्पर उडते व विज पुरवठा खंडित होतो आणि वाऱ्याचा वेग जेव्हा ताशी २२५ ते २७९ किलोमीटर असतो तेव्हा मालमत्तेचे नुकसान होते तर ताशी २८० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेग असल्यास योग्य काळजी घेतली नाही तर जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होते.

- प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,ढगफुटी तज्ज्ञ, कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक, नाशिक ४२२००९संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत. शेतकऱ्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)

टॅग्स :चक्रीवादळमोसमी पाऊसपाऊसशेती क्षेत्र