Join us

मान्सून शब्द आला कसा? नैऋत्य मोसमी पावसाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 22, 2024 5:03 PM

नैऋत्य मोसमी पाऊस कसा पडतो? जाणून घ्या..

Monsoon: रखरखत्या उन्हाने अंगाची काहिली होत असताना प्रत्येकाला आता मान्सूनची आतूरता आहे. नैऋत्य मोसमी पावसाला मान्सून म्हणतात. पण हा शब्द मुळात कुठून आला? नैऋत्य मोसमी पावसाबद्दला या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

शुष्क, कोरड्या जमिनीला शांत करणारा ‘मान्सून’ शब्द मुळात अरेबीक भाषेतून आला आहे. ‘मौसीम’ म्हणजे मोसमी वारे. या अरबी शब्दावरुनच याला मान्सून असे म्हटले जाऊ लागले. पोर्तूगिजांनी जलप्रवासासाठी वाहणाऱ्या वाऱ्यांचा ऋतू या अर्थाने ‘मोन्सौ’ (moncao) असा वापर केला. हळूहळू या शब्दाचा प्रवास होत गेला. आणि आज या शब्दाचा अगदी सहजतेने वापर होतो.

अरबी समुद्र तसेच हिंदी महासागराच्या किनारी प्रदेशात वाहणाऱ्या वाऱ्यांसाठी हा शब्द वापरला जात असे. आशियाई प्रदेशांमध्ये पावसाळा या अर्थाने हा शब्द वापरला गेला. जगातील प्रमुख मान्सून प्रणालीमध्ये पश्चिम आफ्रीका, अमेरिका या देशांमध्ये मान्सून वाऱ्यांचा समावेश होतो.

मान्सूनचे दोन भाग. पहिला जून ते सप्टेंबरदरम्यान येणारा व दुसरा डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पडणारा. तसेच मान्सूनच्या दोन शाखा. एक अरबी समुद्राकडून दाखल होणारा पाऊस जो महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. तर बंगालच्या उपसागराकडून दाखल होणारा पाऊस.

असा पडताे नैऋत्य मोसमी पाऊस

भारताची भौगोलिक रचना द्विकल्पीय असून तीन बाजूंनी समुद्र आणी उर्वरित जमीन. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावरून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास ठरतो. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते आणि दाब कमी होतो. समुद्रातील हवेचा दाब अधिक असतो. या दाबातील फरकामुळे समुद्री वारे कमी दाब असलेल्या जमिनीवरून वाहतात. याच काळात जमिनीवरची हवा थ्ंड होते. यामुळे वाऱ्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि पाऊस पडतो. भारतीय उपखंडाच्या नैऋत्य दिशेहून हे वारे संपूर्ण देशात पसरतात. म्हणून या पावसाला मान्सून किंवा नैऋत्य मोसमी पाऊस असे म्हणतात.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामान