Join us

चैत्री वणवा भडकला, तापमानवाढ होऊन वळवाचा पाऊस होण्याची पंचागकर्त्यांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 4:32 PM

गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा वणवा ४१ व ४२ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत सरकला आहे.

चैत्री वणवा दिवसेंदिवस भडकत चालला असून, उदगीरचा पारा ४२ अंशांपर्यंत सरकला आहे. उष्णतामानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मेघगर्जनेसह वळवाचा व काही ठिकाणी गारांचा पाऊस होऊन जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

मे महिना उजाडल्यानंतर उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली असून, तापमानाचा पारा ४२ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत सरकला आहे. सकाळी ६:४५ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत प्रखर सूर्यप्रकाशाची नोंद उद्गीरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या वेधशाळेत होत आहे. आजपर्यंत वैशाख महिन्यात उदगीरचा पारा ४२ अंशापर्यंत सरकला होता. वैशाख महिना ९ मे पासून सुरू होणार आहे. यंदा मात्र हा वणवा १२ दिवस अगोदर भडकला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा वणवा ४१ व ४२ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत सरकला आहे. यंदाचे क्रोधी नाम संवत्सर नूतन वर्ष ९ एप्रिलपासून सुरू झाले आहे. २२ जून ते १० ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज एका पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

Weather Alert: हवामान विभागाने राज्यात या भागात वर्तवली पावसाची शक्यता, या भागांना उष्णतेच्या लाटांचा इशारा

सध्याच्या वाढत्या तापमानामुळे उदगीर महसूल उपविभागात असलेल्या सर्वच तलावातील पाण्याची पातळी जोत्याखाली गेली असून, अनेक प्रकल्प पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहेत. गावांतील विहिरींनीही तळ गाठला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. तालुक्यातील २१ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागात विद्युतपंपाशिवाय पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मे महिन्यात वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :तापमानहवामान