Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yogesh Gawande : वय अवघं २७, ३ कोटींची वार्षिक उलाढाल, बिल गेट्स फाऊंडेशनसोबत काम; मराठवाड्यातील तरूणाची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:58 IST

शेतकरी महिलांना चालवायला सोपे असल्यामुळे या यंत्राला मोठी मागणी असून मागील ६ वर्षांत योगेशने जवळपास ८ हजार यंत्रांची विक्री केली आहे.

Pune : मराठवाड्यातील एक तरूण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना प्रोजेक्ट म्हणून एक फवारणी यंत्र बनवतो, महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये या प्रोजेक्टला बक्षिसं मिळतात, पुढे याच प्रोजक्टचं प्रोडक्ट बनतं अन् हे प्रोडक्ट मराठवाड्यातील एका तरूणाला बिल गेट्स पर्यंत नेऊन पोहोचवतं. त्याने बनवलेलं, शेतकऱ्यांना कमीत कमी कष्टामध्ये पाठीवर वजन न घेता फवारणी करता येणारं यंत्र अनेकांना फायद्याचं ठरतं आणि याच यंत्राच्या विक्रीतून हा तरूण सध्या वर्षाकाठी ३ कोटींची उलाढाल करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथील योगेश गावंडे या तरूणाची ही यशोगाथा.

छत्रपती संभाजीनगर येथे इंजिनिअरिंग करताना योगेश यांनी बरेच प्रयोग केले. त्यातच गावातील चुलतभावाला फवारणी करताना झालेली विषबाधा आणि त्यातून सुचलेले कल्पनेतून योगेश यांच्या जुगाडू फवारणी यंत्राचा शोध लागला. शेतकऱ्यांना शेतात काम करताना होणारा त्रास कमी व्हावा आणि महिलांनाही फवारणी करता यावी यासाठी चाकं आणि टाकी असलेलं ढकलत पुढे जाणारं फवारणी यंत्र तयार केलं. हे जुगाडू यंत्र महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ठेवलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला.

कॉलेजमध्ये या यंत्राला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी ते विकायचं ठरवलं आणि सोलापूर रस्त्यावर असलेल्या आडूळ या गावी त्याला विक्रीसाठी ठेवलं. तिथे हजारो लोकांनी ते यंत्र पाहिलं पण विकत घ्यायला कुणीच तयार नव्हतं. त्यानंतर बीडच्या दिशेने जाणाऱ्या एका व्यक्तीने या यंत्राची खरेदी केली. पहिले यंत्र तयार करण्यासाठी ३ हजार ८०० रूपये खर्च आला होता पण त्याची विक्री ३ हजार २०० रूपयांत केली. पुन्हा त्याच व्यक्तीने आणखी फवारणी यंत्राची ऑर्डर दिली. हा अनुभव त्यांच्यासाठी मोलाचा ठरला आणि तिथून त्याच्या व्यवसायाने झेप घेतली.

या व्यवसायामध्ये योगेशला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. मार्गदर्शन मिलिंद कंद सर यांनी याच यंत्रावर काम करण्यासाठी त्यांच्या कंपनीत योगेशला पगारी नोकरी दिली आणि योगेशने झपाटून यावर काम करायला सुरूवात केली. प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर काम केल्यानंतर हाताने ढकलता येणाऱ्या या यंत्रामध्ये मशीनचा वापर केला गेला आणि फवारणी अजून सोपी होत गेली. फवारणीसोबतच कोळपणी, वखरणी हे कामही या यंत्राद्वारे करता येतील अशी सोय करण्यात आली आणि एका यंत्रापासून सुरू झालेला प्रवास हे ५ ते ६ यंत्रापर्यंत पोहोचला.

साधारण जुलै २०१९ मध्ये योगेशने व्यावसायिक पद्धतीने मशीन बनवायला सुरूवात केली. तेव्हापासून मार्च २०२० या काळामध्ये योगेश आणि त्याच्या टीमने ५०० पेक्षा जास्त यंत्राची विक्री केली. यातून जवळपास २० लाख ९६ हजारांची उलाढाल त्याने केली. आत्तापर्यंत योगेशने रशिया, केनिया, नायजेरिया, मोझांबिक, जांबिया आणि न्युझीलंड या देशामध्ये यंत्राची निर्यात केली असून भारतातही उत्तरप्रदेश, ओडिसा, बिहार, झारखंड आणि इतर राज्यांत त्याचे यंत्र पोहोचले आहेत.

संस्थांकडून वेळोवेळी मार्गदर्शन

भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि मॅजिक या संस्थेने योगेशच्या सुरूवातीच्या काळात मदत केली. लोन मिळण्यासाठी आणि कॉलेजच्या प्रोजेक्टला प्रोडक्ट बनवण्यापासून मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत मॅजिक संस्थेने मदत केली. त्यानंतर सोशल अल्फा या संस्थेनेही मोठी मदत केल्याचं तो सांगतो.

बिल गेट्स यांच्यापर्यंत कसा पोहोचला?

सोशल अल्फा आणि बिल अँड मिलेंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या इंडिया अॅग्रिटेक इन्क्युबेशन या प्रोग्रॅम अंतर्गत योगेशला ओडिसा, उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार यांसारख्या राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. योगेशने बनवलेले स्प्रेयर हे वुमन फ्रेंडली म्हणजे महिलांना चालवण्यासाठी सोपे असल्यामुळे त्याला ही संधी मिळाली आणि या राज्यामध्ये महिलांना स्प्रेयर आणि इतर कृषी यंत्र सहज कसे वापरता येतील यावर काम करायला मिळालं. या राज्यात जवळपास ४०० ते ५०० मशीन विक्री केले आणि त्या मशीनचा झालेला इम्पॅक्ट पाहून बिल गेट्स यांना भेटण्याची संधी मिळाली आणि योगेशच्या कामाबद्दल त्यांनी कौतुकही केलं.

वर्षाकाठी ३ कोटींची उलाढाल

शेतकरी महिलांना चालवायला सोपे असल्यामुळे या यंत्राला मोठी मागणी असून मागील ६ वर्षांत योगेशने जवळपास ८ हजार यंत्रांची विक्री केली आहे. वेगवेगळ्या २२ राज्यांमध्ये योगेशने तयार केलेले मशीन पोहोचले असून ५ ते ६ देशांमध्ये निर्यातही केली आहे. सध्या या यंत्रातून तो जवळपास ३ कोटींची वार्षिक उलाढाल करत आहे. मराठवाड्यातील तरूणांसाठी योगेशचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yogesh Gawande: 27-Year-Old Achieves ₹3 Crore Turnover, Works with Gates Foundation

Web Summary : Yogesh Gawande, a Marathwada engineer, created a spraying machine, achieving ₹3 crore annual turnover. His farmer-friendly innovation, supported by organizations and the Gates Foundation, has reached numerous countries, empowering women in agriculture.
टॅग्स :शेती क्षेत्र