Join us

व्वा! वयाच्या ५०व्या वर्षी ITI कोर्स करून ४ देशांत घरगुती मसाला निर्यात करणाऱ्या 'मसाला क्वीन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:54 AM

मनात जिद्द आणि शिकण्याची उर्मी असेल तर कोणतेही संकट आपल्याला आडवू शकत नाही आणि कोणताही व्यवसाय करायला वय आडवं येत नाही हे दाखवून दिलंय पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या वंदना पगार यांनी.

- दत्ता लवांडेपुणे : मनात जिद्द आणि शिकण्याची उर्मी असेल तर कोणतेही संकट आपल्याला आडवू शकत नाही आणि कोणताही व्यवसाय करायला वय आडवं येत नाही हे दाखवून दिलंय पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या वंदना पगार यांनी. वयाच्या ५० व्या वर्षी व्यवसायात उतरण्याचा निश्चय करून त्यांनी आपला व्यवसाय यशस्वी केला आहे. त्या आज जवळपास ४ देशांत आपले मसाले निर्यात करतात. केवळ २ महिलांच्या साथीने त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायाची ही कहाणी...

साधारण २०१६ सालची गोष्ट. वंदना त्यावेळी ५० वर्षांच्या होत्या. कुटुंब स्थिरस्थावर झाल्यानंतर काहीतरी व्यवसाय करावा असं त्यांच्या मनात आलं. त्यासाठी त्यांनी काय काय करता येईल याचा शोध घेतला आणि औंधच्या आयटीआय महाविद्यालयात फूड प्रोसेसिंग या कोर्सला प्रवेश घेतला. यावेळी त्यांना अनेकांनी नावे ठेवली. 'हे काय शिकायचं वय आहे का? आत्ता कुठं एकटी बिझनेस करणार आहेस?' असे अनेक टोमणे त्यांना ऐकून घ्यावे लागले. 

आयटीआय पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औंध येथील लाईटहाऊस संस्थेच्या मार्फत जिल्हा उद्योग केंद्रातून मसाले बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे त्यांनी मसाला बनवण्याचे प्रात्यक्षिक ज्ञान अवगत होण्यासाठी 'सुहाना मसाले' यांच्या हडपसर येथील कंपनीत काम करण्यास सुरूवात केली. काही महिने प्रत्यक्ष माहिती घेतल्यानंतर त्यांनी २०१६ साली 'मल्हार फूड्स' या नावाने मसाले बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. 

केवळ दोन महिलांना घेऊन केली सुरूवातत्यांनी हे मसाले बनवण्यासाठी सुरूवातील केवळ दोन महिलांना घेऊन सुरूवात केली होती. अजूनही त्यांच्याकडे केवळ दोनच महिला असून त्यांच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय उभा केलाय. त्यांची दोन मुलेही त्यांना या व्यवसायात चांगली मदत करतात. विशेष बाब म्हणजे त्यांनी हा व्यवसाय घरातूनच सुरू केला होता आणि अजूनही घरातूनच सुरू आहे.

घरगुती पद्धतमसाले बनवण्यासाठी कोणत्याही आधुनिक मशीन आणि यंत्राचा वापर केला जात नाही. तर घरीच गॅसवर भाजून, मिरची कांडप मशीनमध्ये मसाले तयार केले जातात. त्याचबरोबर मसाले तयार करताना कसल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत असं त्या सांगतात. 

उत्पादनेत्यांच्या मल्हार फूड या कंपनीत गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी काळा मसाला, हळद पावडर, चहा मसाला, मिरची पावडर हे मसाले बनवले जातात. त्याचबरोबर दिवाळीच्या वेळेस दिवाळी फराळ बनवला जातो. तोही देशातील विविध ठिकाणी निर्यात केला जातो. 

निर्यातवंदना यांचे मसाले आंतरराष्ट्रीय स्तरावर जपान, बोस्टन, जर्मनी या देशांत निर्यात होतात. त्याचबरोबर यंदा कॅनडामध्ये ते मसाले निर्यात करणार आहेत. देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर जम्मू काश्मीर, गुजरात, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मसाले निर्यात केले जातात. 

प्रशिक्षण आणि सन्मान वंदना यांच्या व्यवसायामुळे त्यांना बऱ्याच संस्थांकडून मसाले आणि इतर फुड ट्रेनिंग देण्यासाठी बोलवण्यात येते. त्यांनी आत्तापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले असून त्यातील अनेकांनी आपला व्यवसाय सुरू केल्याचं त्या सांगतात. तर त्यांना यशस्वी उद्योजिका व बेस्ट ट्रेनर म्हणून बरेच पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये

  • उद्योजक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुणे
  • कौशल्य सिद्धा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुणे
  • नॅशनल प्राइड अवॉर्ड,
  • सिक्कीमचे माजी राज्यपाल यांच्याकडून मेडल मिळाले आहे
  • कस्तुरी गौरव पुरस्कार 
  • महाराष्ट्राची रणरागिनी, राज्यस्तरीय पुरस्कार
  • नवदुर्गा पुरस्कार

असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत .

वेगळी ओळख मी वयाच्या ५० व्या वर्षी धाडस केलं नसतं आणि मसाल्याचा व्यवसाय सुरू केला नसता तर मी आज गृहीणी म्हणून राहिले असते पण मसाल्याच्या व्यवसायामुळे मला वेगळी ओळख मिळाली आहे. 'मसाले निर्यातदार वंदना' म्हणून आता लोकं मला ओळखू लागल्याने आनंद आहे असं वंदना म्हणतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमहिला