Join us

Umed : १५ देशातील खाद्यप्रेमींना लखपतीदीदींच्या पदार्थांची गोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:41 IST

Umed : महिलांना आर्थिक सक्षम करणे, त्यांची सामाजिक उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग केंद्र शासनाच्या वतीने 'उमेद' अंतर्गत राबविला जाणारा प्रकल्प आहे.

विजय मुंडे

जालना : 'उमेद' अंतर्गत जिल्ह्यात २८३ उत्पादक गट कार्यरत आहेत. त्यात पाच हजारांवर महिला विविध मालाचे उत्पादन करीत आहेत. महिलांनी (women) उत्पादित केलेले उत्पादन आजवर पंजाब, दिल्ली, कर्नाटकसह देशाच्या विविध भागांत विक्रीसाठी गेले आहे; परंतु आताच याच महिलांनी उत्पादित केलेली उत्पादने (Product) सातासमुद्रापार १५ देशांमध्ये विक्रीसाठी जाणार आहेत.

विशेष म्हणजे बचत गटाच्या (Bachat gat) माध्यमातून ६३ हजार ३५१ महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखावर गेले असून, त्या लखपतीदीदी झाल्या आहेत.

महिलांना आर्थिक सक्षम (Financial Empowerment of Women) करणे, त्यांची सामाजिक उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग केंद्र शासनाच्या वतीने 'उमेद' (UMED) अंतर्गत राबविला जाणारा प्रकल्प आहे.

केंद्र शासनाने ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (National Rural Livelihood Mission) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१२-१३ पासून विविध योजना राबविल्या जात आहेत.

शेतीशी संलग्न व्यवसाय, बिगर शेती व्यवसायासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यात 'उमेद' अंतर्गत तब्बल १५ हजार ५२५ बचत गट कार्यरत आहेत. या गटातील महिलांना सव्वालाख ते २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते. याच कर्जाचा लाभ घेत जिल्ह्यात तब्बल २८३ उत्पादक गटांची स्थापना झाली आहे.

चालू वर्षात ४०११ महिला बचत गटांना १३९ कोटी २ लाख ६४ हजारांचे कर्ज विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी वाटप करण्यात आले आहे. याच माध्यमातून जिल्ह्यातील हजारो महिला आज यशस्वी व्यावसायिक झाल्या आहेत.

'या' उत्पादनांना मागणी

महिलांनी तयार केलेल्या मसाले, हळद, मिरची पावडर, पापड, खारुडी, धपाटे पीठ, ढोकळा पीठ, दाळबाटी पीठ, विविध फरसाण, गावरान तूप, ॲपल जाम, मध, विविध डाळी, शोभिवंत वस्तू, धोंगडी, योगा मॅट, पत्रावळी, लाकडी खेळणी आदी विविध दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांची मागणी आहे. याच उत्पादनांची १५ देशांमध्ये निर्यात होणार आहे.

'उमेद' मार्टचीही मदत

* महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत जावीत यासाठी जालना शहरातील अंबड चौफुली भागात 'उमेद' मार्ट सुरू करण्यात आले आहे.

* येथे उत्पादनांची विक्री केली जात असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक शैलेश चौधरी यांनी सांगितले.

४० उत्पादनांची ऑनलाइन विक्री

* जिल्ह्यातील महिला उत्पादित करीत असलेल्या ४० उत्पादनांची www.umedmart.com संकेतस्थळावरून विक्री केली जात आहे.

* या संकेतस्थळाच्या माध्यमातून आजवर कर्नाटक, दिल्ली, पंजाब राज्यासह देशभरात महिला बचत गटांनी उत्पादित केलेला माल विक्री केला जात होता.

* आता लवकरच सातासमुद्रापर १५ देशांमध्ये जिल्ह्यातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री होणार आहे.

जिल्ह्यातील लखपतीदीदी

तालुकालखपतीदीदी
अंबड५२८५
बदनापूर४८६०
भोकरदन२१२९१
घनसावंगी२९९७
जाफराबाद९७२७
जालना५३९४
मंठा७००२
परतूर६७९५

'उमेद' अंतर्गत बचत गट

जालना२३५३
भोकरदन२९२०
घनसावंगी१८३३
अंबड२३०५
बदनापूर१५६६
परतूर१४९६
मंठा१४७

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वसाह्यता गटातील महिलांनी व्यवसाय सुरू करावा, यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. त्यांना गरजेनुसार कर्जाचा पुरवठा केला जातो. कर्जपुरवठ्याचा लाभ घेत आज हजारो महिला व्यावसायिक झाल्या आहेत. त्यांची उत्पादने देशभरात जात असून, लवकरच ती देशाबाहेरही पाठविली जाणार आहेत. - वर्षा मीना, सीईओ, जि.प.

'उमेद‌'अंतर्गत आम्ही मसाले उत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. प्रशासकीय मदत आणि मार्गदर्शनामुळे आमच्या व्यवसायाला चालना मिळत आहे. आमच्या भागातील अनेक महिला आज यशस्वी व्यवसायिक झाल्या आहेत. - प्रणिता तौर, लिंबी

हे ही वाचा सविस्तर : Women Farmer : डॉक्टर महिलेने केले शेतीचे नंदनवन वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमहिलासरकारसरकारी योजनाकेंद्र सरकारजालना