अनंत जाधवसावंतवाडी : निसर्गाचा लहरीपणा व वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेती बागायती ओस पडत चालली असतानाच नेमळे येथील शेतकरी सीताराम राऊळ यांनी लिली लागवडीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या लिलीची ३५ गुंठे क्षेत्रात लागवड केली असून, त्यातून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. विशेष म्हणजे हवामान बदलाचे सोडा, वन्यप्राण्यांकडून कोणताही त्रास नसल्याने राऊळ यांची लिलीची लागवड जोमात आहे.
विशेष म्हणजे वृद्धापकाळात राऊळ यांनी लिलीचा केलेला हा प्रयोग वाखाणण्याजोगाच म्हणावा लागेल. मुंबई-गोवा महामार्गावरील नेमळे हे गाव तसे निसर्गाच्या सानिध्यातील हिरवी शालू पांघरलेले.
मात्र नेमळे गावाच्या बाजूलाच नरेंद्र डोंगर असल्याने त्या जंगल क्षेत्रात असलेले वन्यप्राणी हे थेट शेती बागायतीत शिरून शेतीचे नुकसान करतात. त्यामुळे येथील शेतकरी नेहमीच अर्थिक विवंचनेत दिसून येतात.
त्यातूनच येथील काही शेतकऱ्यांनी तर शेती बागायती सोडून दिली आहे. पण नेमळे गावातील शेतकरी सीताराम राऊळ हे याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या वृध्दाकाळातही शेतीला पर्याय शोधला असून, ३५ गुंठे क्षेत्रात लिलीची लागवड केली आहे.
शेतीबद्दल प्रचंड कुतूहल आणि नवनवीन प्रयोगांची आवड असलेल्या राऊळ यांनी लिली पिकाविषयी माहिती घेतली. त्यांनी या फूल पिकाला वन्यप्राण्यांकडून नुकसान होते का, याचाही शोध घेतला. त्यानंतर लिली लागवडीचा निर्णय घेतला आहे.
नियोजनबद्ध काम- ज्या ठिकाणी आंबा लागवड आहे, त्याचठिकाणी असलेल्या सात-आठ गुंठे क्षेत्रात त्यांनी पहिल्यांदा २०१८ मध्ये लिली लागवडीचा निर्णय घेतला.- लिलीचे कंद निरवडे येथून त्यांनी खरेदी केले.- लागवडीची पूर्ण माहिती घेतली. बेड तयार करून त्यांनी लिली कंदाची लागवड केली.- दोन महिने नियोजनबध्द काम केले.- लागवडीनंतर दीड-दोन महिन्यांतच उत्पादनाला सुरुवात झाली.- आज गोव्यासह अन्य भागात लिलीच्या फुलांना मोठी मागणी आहे.
मुंबईत नोकरीला कंटाळून गावी आलो. शेती व बागायतीमध्ये निसर्ग साथ देत नव्हता. त्यामुळे २०१८ मध्ये आठ गुंठे क्षेत्रावर लिली लागवडचा प्रयोग केला. त्यात फायदा होतो हे लक्षात आल्यावर हे क्षेत्र ३५ गुंठ्यांपर्यंत नेले. निसर्गाच्या लहरीपणाचा व वन्यपशू-पक्षी यांचा त्रासही थांबला. आज मी ७० वर्षाचा आहे. सकाळी उठून लिलीची फुले काढून बाजारपेठेत विक्री करत आहे. - सीताराम राऊळ, शेतकरी
अधिक वाचा: Farmer Success Story : माळरानात चमकलं सोनं; डाळिंबामधून मिळालं ३५ लाखांचं उत्पन्न