Join us

Sorghum : ज्वारीचे प्रोडक्ट ८ देशात निर्यात करणारे दाम्पत्य! लोकल ज्वारीला दिली ग्लोबल ओळख

By दत्ता लवांडे | Updated: January 8, 2025 14:31 IST

तुमच्या खिशात पैसा नसला किंवा तुम्ही गरीब असलात तरी चालेल पण तुमच्या मोबाईलमधील संपर्काची यादी मोठी आणि श्रीमंत असली पाहिजे. त्याबरोबरच कोणतेही काम करताना पैशांना टार्गेट न करता, प्रामाणिकपणा आणि सातत्य असेल तर तुमच्याकडे पैसा यायला वेळ लागत नाही ही दोन तत्वे डोळ्यासमोर ठेवून तात्यासाहेब काम करतात. त्यांच्या या कामाचं फळ त्यांना आज मिळतंय.

तात्यासाहेब फडतरे. दुष्काळी भागातल्या लोकल ज्वारीला ग्लोबल ओळख देणारा माणूस. पत्रकार, व्यवसायिक आणि विविध क्षेत्रात नोकरी करून चौदा वर्षापूर्वी त्यांनी मिलेट्स प्रक्रिया उद्योग सुरू केला. देशातील पहिली ज्वारीची इडली बनवण्याचा मान त्यांनी मिळवला आणि आज ते 'गुड टू ईट' या ब्रँडखाली ज्वारी, बाजरी, नाचणीचे प्रक्रिया केलेले पदार्थ ८ देशांमध्ये पोहोचवत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या वडापूर येथील तात्यासाहेब हे रहिवाशी. वडील शेतकरी आणि किर्तनकार. १२वी पास झाल्यानंतर आयटीआयला प्रवेश घेण्याचा निर्णय होता पण कृषी अधिकारी असलेल्या चुलत्यांच्या म्हणण्यानुसार तात्यासाहेबांनी कृषी पदवीला प्रवेश घेतला. जिरायती जमीन असल्यामुळे जास्त उत्पन्न नव्हतं. त्यामुळे तात्यासाहेब यांनी पुढे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

पदवी पूर्ण झाल्यानंतर काही वर्षातच त्यांनी पुण्यात नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. नर्सरीचा व्यवसायातून चांगला पैसाही येत होता पण त्यामध्ये त्यांचे मन रमले नाही. पुढे त्यांनी कृषी अधिकारी, इन्चार्ज प्रिन्सिपल या पदावर साडेतीन वर्षे काम केले. त्यानंतर हैद्राबाद येथे ईटीव्ही या माध्यम क्षेत्रात कृषी पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यात एका खासगी संस्थेत काम केले पण ही नोकरीसुद्धा त्यांनी सोडली. 

दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी सरोजिनी यांनी पिठाचा व्यवसाय सुरू केला होता. पिठाच्या ऑनलाईन डिलीव्हरी तात्यासाहेब करायचे. २०१२ मध्ये त्यांनी याच व्यवसायाला जोड दिली आणि २० शेतकऱ्यांचा एक ग्रुप बनवला. सरकारच्या एका योजनेतून त्यांना ४ लाखांच्या मिशनरी मिळाल्या.

त्यातून त्यांनी ज्वारीची चकली, इडली, रवा, शंकरपाळे तयार केले. त्यानंतर त्यांनी ज्वारीच्या इडलीचे रेडी मिक्स तयार केले. त्यांनी बनवलेले इडली रेडी मिक्स हे मार्केटमध्ये पहिलेच होते. पुणे त्यांनी राहुरी येथे २७ लाखांचे ज्वारी प्रक्रिया युनिट उभारले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला.

ज्वारी, बाजरी, नाचणी खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडून घेतलंय, बाजारदरापेक्षा एक रूपया जास्त देऊन शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो. सेंद्रीय उत्पादने तयार करण्याच्या अनुषंगाने आत्तापर्यंत ५५० पेक्षा जास्त शेतकरी त्यांनी जोडले असून ८७ हेक्टर क्षेत्र तिसऱ्या वर्षातील सेंद्रीय शेती प्रमाणीकरणाखाली आणलंय. 

उत्पादने'गुड टू इट' या ब्रँडखाली ज्वारीचे पोहे, ज्वारीची इडली, ज्वारीचा रवा, ज्वारीचा चिवडा, रेडी मिक्स आणि यासोबतच नाचणी, बाजरीचे असे मिळून ४० ते ४५ उत्पादने तयार केले जातात. 

कुटुंबाची साथत्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. उत्पादनांचे संपूर्ण प्रोडक्शन सरोजिनी याच सांभाळतात. तर तात्यासाहेब हे मार्केटिंगचे काम बघतात. मिलेट्स उत्पादने पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कृषी प्रदर्शनामध्ये विक्री करण्यासाठी त्यांच्या दोन लहान मुलींनीही त्यांना साथ दिली. लहान मुलगी अगदी सात वर्षांची असल्यापासून तिने विक्रीसाठी मदत केली. आजही त्यांच्या मुली व्यवसायामध्ये आपल्या आईवडिलांना साथ देतात. यासोबतच तात्यासाहेब यांचे आईवडील आणि सासू-सासरे यांचीही मोलाची साथ त्यांना लाभली.

८ देशांत निर्यातदरम्यान, २०१७ ला ज्वारी, बाजरी, नाचणीचे उत्पादने नेदरलँडला पाठवायला सुरूवात केली. सध्या सिंगापूर, दुबई, यूएस, नेदरलँड, कॅनडा या देशामध्ये उत्पादनांची निर्यात केली जाते. बाहेरच्या देशातील मराठी लोकांना हे प्रोडक्ट विकण्याचा त्यांचा मानस आहे. आज ८ देशामध्ये त्यांची उत्पादने पोहोचले असून अजूनही काही देशांत उत्पादने निर्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशांतर्गत मार्केटमध्येही त्यांनी चांगला जम बसवलाय.

पुरस्कार-सन्मान२०१६ला दूरदर्शनचा कृषीसन्मान पुरस्कार फडतरे दाम्पत्यांना मिळाला. आत्तापर्यंत त्यांना १५ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले असून अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून मार्च २०२४ मध्ये बुद्ध इन्स्टिट्युटची फेलोशिप त्यांना मिळाली आहे. 

उलाढालअगदी घरातून पिठांची डिलीव्हरी देण्यापासून सुरू केलेल्या या व्यवसायाने आता चांगलीच भरारी घेतली आहे. शून्यातून सुरू केलेल्या आणि संघर्षातून उभ्या केलेल्या त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल आता अडीच कोटीपर्यंत पोहचलीये. या यशामध्ये त्यांच्या कुटुंबानी त्यांना चांगली साथ दिल्याचं ते सांगतात. 

तुमच्या खिशात पैसा नसेल किंवा तुम्ही गरीब असलात तरी चालेल पण तुमच्या मोबाईलमधील संपर्काची यादी मोठी आणि श्रीमंत असली पाहिजे. त्याबरोबरच कोणतेही काम करताना पैशांना टार्गेट न करता, प्रामाणिकपणा आणि सातत्य असेल तर तुमच्याकडे पैसा यायला वेळ लागत नाही ही दोन तत्वे डोळ्यासमोर ठेवून तात्यासाहेब काम करतात. त्यांच्या या कामाचं फळ त्यांना आज मिळतंय. त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी