Join us

पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 1:24 PM

कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे.

दत्तात्रय पाटीलम्हाकवे येथील युवा शेतकरी सतीश ऊर्फ सिद्राम शिवाजी पाटील यांनी प्रचंड मेहनत करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर खडकाळ माळरानावर एकरी १२० टन उसाचे उत्पादन घेऊन मजल मारली आहे.

कृषी पदविकाधारक बनल्यानंतर सतीश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी कागल तालुक्यात विक्रम नोंदविला असून, त्यांचे कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, यावरच न थांबता आता एकरी १४० टन घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर नोकरदारांपेक्षाही अधिक उत्पन्न मिळविता येते, याची प्रचिती सतीश यांनी दिली आहे.

फेब्रुवारीत ट्रॅक्टरच्या एक फाळी पलटीच्या साहाय्याने नांगरट केली. मे महिन्यात ५ ट्रॉली शेणखत व १५ टन कंपोस्ट खत टाकून नांगरट केली. पाचफुटी सरी मारून २ जून, २०२२ रोजी पाणी देऊन वाफसा आल्यानंतर कुदळीने दीड फूट अंतरावर को ८६०३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागवड करून पुन्हा पाणी दिले.

तीन महिन्यांनंतर भरणी केली. यासाठी रासायनिक खतांचे सहा ठोस दिले, तर जीवाणू खते, किटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके फवारून आळवण्या घेतल्या. दरम्यान, राधानगरी कृषी विभागामार्फत तालुक्यातून ४०० शेतकऱ्यांनी पाटील यांच्या ऊसशेतीला भेट दिली आहे.

त्यांना विजय मगदूम (सिद्धनाळ) यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच कृषी सहायक ओंकार जाधव, महेश पटेकर, बंडू जंगटे, अमर पाटील (बानगे), केदार माळी यांचे सहकार्य लाभले.

एकरी तीन लाखांचे उत्पन्न..‌मशागत, कंपोस्ट, शेणखत यासह रासायनिक खते फवारणीसाठी एकरी १ लाख १५ हजार रुपये खर्च आला आहे. तर खर्च वजा जाता २ लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

ध्येय निश्चित करूनच शेतीकडे वळलो. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न हेच उद्दिष्ट असले पाहिजे. पुढील वर्षासाठी एकरी १४० टन उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. - सतीश पाटील, शेतकरी, म्हाकवे

अधिक वाचा: ऊसाला पाणी कमी पडतंय.. हे करा आणि ऊसाची पाण्याची गरज भागवा

टॅग्स :ऊसशेतीशेतकरीपीकसेंद्रिय खतखते