Join us

मोहाफुलाचे लाडू, जॅम अन् चटणीची खवय्यांना पडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:50 AM

दारूसाठी प्रसिद्ध असलेला मोह

देवेंद्र पोल्हे

माळपठारावरील कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहाचा हंगाम सुरू झाला आहे. दरदिवशी पहाटे झाडाखाली पडलेल्या मोहफुलांचे संकलन करून त्याचा करण्यात येत आहे. या मुलांपासून तालुक्यातील ६० कोलाम महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार करण्यात येत असून यातील लाडू, जॅम, चकत्या, ज्यूस आणि चटणीचा सर्वत्र सुगंध दरवळत असून खवय्ये अगदी आवडीने या पदार्थांची खरेदी करत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या झरी, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी तालुक्यात डोंगराळ व जंगलात मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहेत. आदिवासी कोलाम महिला व पुरुष या मोहफुलांचे संकलन करतात आणि खासगी व्यापाऱ्यांना त्याची विक्री करतात. यातून आदिवासी बांधवाना अल्प फायदा होतो, ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टने आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सन २०१३ मध्ये चार तालुक्यात दिशा महिला महासंघाची स्थापना केली.

यामध्ये आदिवासी कोलाम महिलांचे समूह तयार केले. या महिलांना चार वर्षांपूर्वी मोहापासून विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. बचत गटातील महिला आता या मोहफुलापासून लाडू, शंकरपाळे, चकली, मनुका, बर्फी, सरबत, पुरणपोळी इत्यादी पदार्थ तयार करीत आहेत. चार तालुक्यातील ६० बचत गटाच्या महिलांना मोहफुलांपासून विविध वस्तू तयार करून त्यांची विक्री करण्याचा नवा मार्ग सापडला आहे.

या बचत गटाच्या महिला शासनाचे विविध ठिकाणी लागणारे सरकारी स्टॉल, सामाजिक संस्था एनजीओ, उद्योजिका स्टॉल, उमेदअंतर्गत लागणारे स्टॉलच्या माध्यमातून वस्तूची विक्री करतात. मोहाफुले गोळा केल्यानंतर फुले स्वच्छ धुवून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया केली जाते.

त्यानंतर मोहफुलांना शिजवून विविध प्रकारचे ड्रायफ्रूट आणि इतर साहित्यातून लाडूसह विविध पदार्थ डबाबंद केले जातात. तयार केलेली उत्पादने टिकाऊ असल्याने त्यांची मागणी वाढत आहे. गेल्या काही वर्षात मोहफुलांपासूनच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.

गटांना मिळाले उत्पन्न 

गेल्या हंगामात या उपक्रमातून बचत गटांना आणि दिशा महासंघाना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा फायदा झाला होता. यंदा मोहफुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा बुकिंग सुरू झाल्याची माहिती देण्यात आली.

फेब्रुवारीपासून सुरू झाला फुलांचा हंगाम

मोहाचे शास्त्रीय नाव मधुका लॉजिफोलिया आहे. लॉजिफोलिया म्हणजे लांब पाने असलेला. जंगली भागात आढळणारा मोह अर्थात महू हा बकुळ कुळातील आहे. याला उत्तर मोह असेही म्हणतात. या झाडाची उंची ७ ते १५ मीटरपर्यंत वाढते.

सातपुड्यात मोहाची असंख्य वृक्ष आहेत. झाडाचा व्यास ५ ते १० मीटरपर्यंत वाढतो. या झाडांच्या फुलांचा हंगाम हा फेब्रुवारी ते एप्रिल आणि फळांचा हंगाम हा मे ते जुलै असा असतो. बियांपासून रोपे सहज तयार होत असल्याने जंगलात या झाडांची संख्या वाढली आहे.

हेही वाचा - टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

मोहफुलापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांना मागणी आहे. विविध प्रदर्शनामध्ये हे पदार्थ लोकप्रिय ठरले आहेत. यातून मागणी नुसार पुरवठा केला जात आहे.या माध्यमातून चार तालुक्यातील ६० बचत गटांना लाभ मिळत आहे. - सुनीता सातपुते, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट.

टॅग्स :यवतमाळशेतीमहिलाग्रामीण विकास