Join us

विना सहकार नाही उद्धार! सहकारातून समृद्धीचा मार्ग दाखवणारे सहकार आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 8:32 PM

सहकार विभागाचे आयुक्त अनिल कवडे यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास आणि अनुभव याविषयी जाणून घेणार आहोत. 

महाराष्ट्राच्या विकासाचा आणि आर्थिक घडामोडींची आत्मा म्हणजे सहकार क्षेत्र आहे. विविध संस्था, विकास सोसायट्या, सहकारी बँका, सहकारी कारखाने, दूध संघ, प्रक्रिया उद्योग या सर्वांचा संबंध सहकार विभागाशी येतो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकाराचा मोठा वाटा आहे. लोकमत अॅग्रोच्या कृषीदूत या सिरीजमध्ये शेतीशी नाळ असलेले सहकार विभागाचे आयुक्त अनिल कवडे यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास आणि अनुभव याविषयी जाणून घेणार आहोत. 

सध्या राज्याचे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत असलेले अनिल कवडे हे १९८७ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. सुरूवातील उपजिल्हाधिकारी म्हणून ते रूजू झाले होते. त्यानंतर २००४ च्या बॅचमध्ये ते आयएएस झाले. यादरम्यान त्यांनी अनेक वेगवेगळ्या खात्यामध्ये काम केले. सुरूवातीची सेवा महसूल खात्यामध्ये झाली. यामध्ये शेती आणि जमीन या विषयामध्ये त्यांचा संबंध आला. उपजिल्हाधिकारी प्रवर्गामध्ये काम करताना पुढे त्यांनी भूसंपादन अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले. पुढे त्यांनी सांगलीला अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. पुढे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळामध्ये त्यांनी काम पाहिले. 

त्यानंतरच्या काळात जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम अशा क्षेत्रांत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या वेळी त्यांनी 'वुई लर्न' नावाचा उपक्रम राबवला. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे आणि संगणकाचे ज्ञानही अवगत झाले. आरोग्यामध्ये 'शारदा ग्रामआरोग्य संजीवनी' नावाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. जो ग्रामीण आरोग्यामध्ये सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम ठरला. त्यानंतरच्या काळामध्ये नोंदणी महानिरिक्षक म्हणून काम पाहिले व आता सहकार आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. 

सहकार आयुक्त म्हणून कार्यरत असतानासुद्धा अनिल कवडे यांनी शेतीशी संबंध ठेवला. पीक कर्ज हा विषय त्यांच्या अखत्यारित येत असल्यामुळे त्यांनी पीककर्जाचे वाटप करून शेती निविष्ठा पुरवण्यासाठी काम केले. राज्यातील जवळपास २० हजारांपेक्षा जास्त विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम केले जाते. शेतकऱ्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या उत्पादनासाठी खूप संधी आहेत, त्याचबरोबर शासनाच्या अनेक योजनासु्द्धा आहेत त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे असं ते सांगतात. जलयुक्त शिवार अभियान हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता. यामध्ये अनेक गावे सहभागी झाले आणि साकारात्मक बदल झाले याचा मला खूप अभिमान आहे असं ते सांगतात. 

तरूणांनी शेतीत संधी आहेत

आजकालच्या तरूणांच्या अपेक्षा अचूकता, वेग, अचूकता, पारदर्शकता, विश्वासाहर्ता अशा आहेत पण शेती हा सुद्धा महत्त्वाचा उद्योग आहे हे तरूणांनी समजून घेतलं पाहिजे. स्पर्धा परिक्षा हे मानवाच्या विकासामधील एकमेव गोष्ट नाही. संशोधन, विकास, कौशल्य, बुद्धीमत्तेला वाव देणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये काम करण्यात आपल्याला वाव आहे असं ते म्हणतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमुलाखत