Join us

बागायती पिके सोडून बहरली फुलशेती, तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 9:25 AM

गोदावरी प्रवरा संगामाचा सुबक पट्टा. पुरातन मंदिरांमुळे या शेतकऱ्याला रोजगाराचा नवा मार्ग गवसलाय..

तारेख शेख

गोदावरी नदीकाठच्या ऊसबहुल पट्ट्यात बिजली आणि गलांडा फुलांची शेती करून एका तरुण शेतकऱ्याने पारंपरिक पिकांकडून इतर पिकांकडे वळण्याचा आदर्श उर्वरित शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे. अनिरुद्ध कान्हे, असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

कायगाव परिसर शेतीसाठी बागायती भाग म्हणून ओळखला जातो. ऊस, कापूस, गहू, सोयाबीन, कांदा आदी पिकांकडे येथील शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या अनेक वर्षांत हा कल बदलला नाही. पारंपरिक पद्धतीने शेती आणि पिके घेऊन शेतकरी शेती करतात. यात अनेकदा नैसर्गिक आणि इतर अडचणींमुळे शेतकऱ्यांना शेतीत मोठे नुकसान होते.अशात पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक आणि शास्त्रोक्त शेती करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून नेहमी दिला जातो. मात्र, कोणताही नवीन प्रयोग करायला शेतकरी तयार होत नाहीत. अशात जुने कायगाव येथील तरुण शेतकरी अनिरुद्ध कान्हे यांनी प्रवाहापलीकडे जाऊन बिजली आणि गलांडा फुलांची शेती करण्याचा निर्धार केला. आणि मागील दहा वर्षांत त्यांचा प्रयोग यशस्वीसुद्धा होत आहे. त्यांनी स्वतःच्या २० गुंठे शेतात बिजली आणि गलांडाच्या फुलांची फुलशेती केली. बिजली फुलांचे पीक साधारण तीन ते चार महिन्यांचे असते. तर गलांडा फुलांचे पीक आठ-नऊ महिन्यांचे असते.

भाविकांची सोय

• जुने कायगाव येथे गोदावरी-प्रवरा नदीचे संगम आहे. तसेच नदीकाठावर अनेक पुरातन मंदिरे आहेत. तसेच जुने कायगावात दररोज हजारो भाविक अंत्यसंस्कार, दशक्रिया, मुंज, याबरोबर अनेक धार्मिक विधीसाठी गर्दी करतात.

• येणाऱ्या भाविकांना विविध फुलांची गरज पडते. सुरुवातीला फुले आणण्यासाठी भाविकांना गंगापूर, नेवासा आदी भागाकडे जावे लागत असत. मात्र, आता गावांत फुलशेती होऊ लागल्याने भाविकांचीही गैरसोय दूर झाली आहे. तर यातून स्थानिकांना रोजगाराचा नवीन मार्ग सापडला आहे.फुलांच्या बाजारात मागणी

• छत्रपती संभाजीनगर, गंगापूर येथे फुलांच्या बाजारात या फुलांना मोठी मागणी आहे. त्यानुसार उर्वरित माल तेथील बाजारात नेऊन विकला जातो. इतर पिकांसारखा फुलशेतीमध्येसुद्धा अनिश्चितता असतेच; पण शेती म्हटली की, नफा-तोटा गृहीत धरून काम करावे लागते, अशी प्रतिक्रिया शेतकरी अनिरुद्ध कान्हे यांनी दिली.

टॅग्स :फुलशेतीगोदावरीमंदिरफुलंफलोत्पादन