- उमेश सिंगनजुडे
Farmer Success Story : आजघडीला उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असं वातावरण निर्माण झाले. अशाही परिस्थितीत शेतीला उदरनिर्वाहाच साधन समजून कष्ट, परिश्रम आणि कृषी तंत्रज्ञानाची (Agriculture Techniqus) जोड देत फुल शेती, कुक्कुटपालन व फुल विक्री दुकान सुरु करून शेती हा व्यापार व नोकरीला चांगला पर्याय आहे, हे लाखनी येथील महिला शेतकरी अर्चना विलास ढेंगे यांनी दाखवून दिले आहे.
प्रगतशील महिला शेतकरी अर्चना विलास ढेंगे (Archana Vilas Dhenge) यांच शिक्षण कला शाखेतील पदवी पर्यंत. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १२०० सेमी असलेल्या जिल्ह्यात भात प्रमुख पीक घेतलं जातं. बदलते हवामान तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अवर्षण तर कधी दुष्काळ, वाढती महागाई, मजुरांची टंचाई अशी परिस्थितीत भात शेतीच नुकसान होते व अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
भात शेतीव्यतिरिक्त इतर कुठलाही अनुभव नसताना शेतीपूरक घरगुती स्वरूपाचा जोडधंदा अथवा व्यवसाय करता येईल काय? या विचारातून अर्चना यांनी केसलवाडा वाघ येथील शेतीत फुलशेती व कुक्कुटपालन सुरू करण्याचा निश्चय केला. तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर व कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत व स्वखर्चाने केसर जातीच्या एकूण ३५० आंबा कलमाची सघन पद्धतीने वरंब यावर लागवड केली.
यासाठी त्यांना ६५ हजार ५०० रुपयांचे आर्थिक अनुदान मिळाले. आंबा फळबागेला पाण्याच्या नियोजनाकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत एकूण रुपये ३२ हजार २५७ एवढे आर्थिक अनुदान मिळाले. नवीन पद्धतीमध्ये खर्चात बचत झाली.
इतर महिलांना प्रेरणादायीशेती व्यवसाय, फुल शेती, कुकूटपालन, फुल विक्री व्यवसाय या बरोबर विविध सामाजिक उपक्रमात हिरहिरीने सहभाग नोंदवितात. महिलांनी शेती व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय करून आपल्या परिवारास अर्थसहाय्य करावे असे त्यांचे मत आहे. शेतीबरोबर इतर पूरक व्यवसाय करण्याची त्यांची जिद्द इतर महिलांना प्रेरणादायी ठरत आहे.
कमी खर्चाची शाश्वत शेतीकृषी विभागाच्या सल्ल्याने लागवड केलेल्या आंबा फळबागेत आंतरपीक म्हणून केंद्र सरकारच्या पूरक 'कप फ्लोरिकल्चर मिशन'च्या सल्ल्याने फुल शेतीला सुरुवात केली. लाखनी शहरात फुल विक्रीचे दुकान सुरु केले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करण्यास सुरुवात केली. कृषी व इतर विभागाच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चाची शाश्वत शेती करून भात शेतीला उत्तम पर्याय पीक पद्धतीचे मॉडेल राबवून एक प्रगतशील महिला शेतकरी म्हणून पुढे येत आहेत.