Join us

केळी पिकात टरबुजाचे आंतरपीक, जळगावच्या शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 6:12 PM

जळगावच्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली आहे.

जळगाव : यंदा पाऊस कमी असल्याने अनेक भागात शेती पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. अशा स्थितीत दुष्काळी परिस्थितीवर मात करत जळगाव जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जयनगर परिसरातील शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवडीतून एकरी सुमारे सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

राज्यातील बहुतांश भागात यंदा दुष्काळी स्थिती असून यातूनही शेतकऱ्यांनी मार्ग काढत रब्बी हंगाम फुलवला आहे. शहादा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचे योग्य नियोजन करून जयनगर व परिसरातील शेतकऱ्यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तीन टप्प्यामध्ये केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली. तीन टप्प्याच्या लागवडीतून अडीच-अडीच महिन्यात एकूण लागवडीपैकी दोन टप्प्यांमध्ये चांगले उत्पन्न मिळत आहे. एकरी पावणे दोन ते दोन लाखांचे उत्पन्न टरबूज पिकातून शेतकऱ्यांना मिळाले आहे. 

जयनगरसह परिसरात अनेक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती असल्याने पिकांना पाणी पुरविणे जिकिरीचे जात आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या कूपनलिकेला आणि विहिरीला चांगले पाणी आहे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन करून केळी पिकामध्ये आंतरपीक म्हणून टरबूज लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. संकरित बियाण्याचा वापर करून केळी पिकात ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आंतरपीक म्हणून लावलेल्या टरबुजासाठी रासायनिक खत व औषध फवारणीचे योग्य नियोजन केल्याने चांगले उत्पादन निघत आहे.

केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबुजाचे उत्पन्न घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे. टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने केळीवर कोणताच प्रतिकूल परिणाम होत नाही. वातावरणानुसार रासायनिक विद्राव्य खताचे तसेच औषध फवारणीचे योग्य नियोजन केल्यास अधिक उत्पन्न घेता येते. एकरी सरासरी टरबूज पिकाला ६० हजार रुपये भांडवल लागले असून सरासरी १० ते १२ रुपये प्रती किलो दर मिळाला आहे. - विठोबा रामदास करंजे, शेतकरी, जयनगर, ता. शहादा. 

टॅग्स :शेतीजळगावकेळीडाळिंबशेती क्षेत्र