Join us

Success Story : डिंकाचा डंका! वाशिम जिल्ह्यातील महिलांनी उभारला अनोखा डिंक उद्योग, वाचा यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 7:56 PM

झाडाचा डिंक गोळा करून त्याचे पॅकिंग करून विक्री सुरू करून उद्योगाला उभारी दिली आहे.

वाशीम : जंगल व शेतशिवारात फिरून डिंक गोळा करायचा व तो व्यापाऱ्यांना कमी भावात विकायचा; परंतु 'उमेद'च्या लाभलेल्या साथीमुळे मानोरा तालुक्यातील डोंगराळ आणि आदिवासी भागात असलेल्या गोस्ता (रुई) येथील गजानन महाराज स्वयंसहायता महिला समूहच्या महिलांनी जंगलातील धावंडा प्रजातीच्या झाडाचा डिंक गोळा करून त्याचे पॅकिंग करून विक्री सुरू करून उद्योगाला उभारी दिली आहे.

'उमेद'ने या समूहाला योग्य मार्गदर्शन केल्याने या उद्योगाने आता उभारी घेतली असून, या डिंकाची मुंबई, पुणे येथे विक्री केली जात आहे. त्यामुळे या समूहाचे नाव राज्यभर गाजले आहे. या समूहाची स्थापना २०१४ मध्ये झाली. येथे जंगलाचा भाग जास्त असल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे महिला या व्यवसायाकडे वळल्या. या समूहात १० महिला असून,हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. जंगलातून धावंडा डिंक गोळा करून व्यापाऱ्याला १०० ते १५० रुपये किलोने विक्री केल्या जात होता. हा समूह उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती मानोराला जुळलेला आहे.

एकदिवसी उमेद अभियानाचे अधिकारी पवन आडे या गावात ग्रामसंघाच्या मीटिंगकरिता आले. त्यांनी महिलांना या डिंकाला योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी पॅकिंग, बॅण्डिंग व लेबलिंग करून विक्री करण्याविषयी मार्गदर्शन केले व मानव विकास मिशनबद्दल व उद्योग- व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर वर्ष २०२१-२२ मध्ये या समूहाला मानव विकास कार्यक्रमामधून १ लाख ५६ हजार रुपये मंजूर झाले. त्यामध्ये या समूहाने १० टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याला व ९० टक्के सबसिडी मिळाली. मिळालेल्या निधीमधून समूहाने ड्रायर, वजन-काटा, पॅकिंग मशीन खरेदी केली व उरलेल्या पैशांमधून गावातील इतर समूहांतील महिलांकडून डिंक खरेदी करणे सुरू केले. समूहाच्या प्रमुख छाया हरिभाऊ पवार सांगतात..

आज व्यवसायाला उभारी

सन २०२३ ते २०२५ मध्ये आम्ही समूहाकडून २५० रु. प्रति किलो प्रमाणे ७ क्विंटल ५० किलो माल १ लाख ८७ हजार रू. खरेदी केला व ड्रायरमध्ये वाळवनी करून ग्रेडींग करून तोच माल आम्ही ३९० रु. प्रती किलो प्रमाणे २ लाख ७३ हजार रु. ला व्यापा-याला विक्री केली. त्यामधुन आम्हाला ८५ हजार ५०० रु. नफा मिळाला. त्याच बरोबर प्रथम ५० किलोचे पॅकिंग करून मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनी, नागपूर येथील प्रदर्शनीमध्ये व मागणी प्रमाणे विक्री करणे सुरु आहे. आमचे गाव वाशीम जिल्हयातील शेवटच्या टोकावर असून चहुबाजुनी डोंगरदरीचा भाग असून पुस नदीने वेढलेले गाव आहे. कामाच्या शोधात असणाऱ्या गरजू महिलांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य केल्यामुळे आज व्यवसायाला उभारी मिळाली असल्याचे गजानन महाराज बचत गट समूहाच्या प्रमुख छाया हरिभाऊ पवार आणि महिला सांगताहेत.

गोस्ता येथे एका उमेद ग्रामसंघाच्या मीटिंगसाठी गेलो असता या महिला जंगलात जाऊन डिंक गोळा करून कमी दराने व्यापारी यांना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. मी त्यांना हा डिंक पॅकेजिंग, बॅण्डिंग करून योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांनी जिद्दीने सांगितल्या प्रमाणे काम सुरु केले, त्यांना उमेदकडून आर्थिक मदत मिळवून दिली, त्यामुळे आता येथील डिंक महानगरात विक्री होत आहे.

- पवन आडे, व्यवस्थापक, उमेद मानोरा 

टॅग्स :शेतीवाशिमशेती क्षेत्र