Join us

Success Story : शंभर एकरावर आले शेती, एकरी 30 टन उत्पादन, अहमदनगरच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 2:24 PM

अहमदनगरच्या भदे परिवाराने आले पिकाचे विक्रमी एकरी 30 टन उत्पादन घेतले आहे.

अहमदनगर : शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा, परंतु एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन जर समजून घेतले तर त्या पिकांतून विक्रमी नफा मिळू शकतो. हेच राहता तालुक्यातील नांदूर येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. स्वयंपाकघरात आणि औषधी वनस्पतीमध्ये आले हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याच आले पिकाची शेती करत नांदूरच्या भदे परिवाराने आले पिकाचे विक्रमी 30 टन उत्पादन घेतले आहे. यातून त्यांना चांगला फायदाही झाला आहे.

आठ ते दहा वर्षांपासून राहाता तालुक्यातील नांदूर हे गाव आले शेतीचे गाव म्हणून पुढे येत आहे. या गावातील अमोल बाळासाहेब भदे आणि त्यांचे बंधू बाबासाहेब भदे हे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आले पिकाची लागवड करतात. याबाबत बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत नेहमीच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांची शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली जाते. दरवर्षी गावात अनेक शेतकऱ्यांकडून जवळपास शंभर एकरांवर आले लागवड होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, पीक संरक्षण विभागाचे भरत दवंगे, मृद विज्ञान विभागाचे शांताराम सोनवणे, उद्यानविद्या विभागाचे डॉ. विलास घुले, विस्तार विभागाच्या प्रमुख प्रियंका खर्डे यांच्या मार्गदर्शनातून या गावात आले शेती यशस्वी होत आहे.

याबाबत अमोल भदे यांनी सांगितले की, दरवर्षी १५ मार्चच्या दरम्यान बियाण्याची निवड करून १५ मे च्या दरम्यान त्यांची लागवड प्रत्यक्ष शेतात केली जाते. शेतीची दोन वेळा नांगरणी, एक वेळा कल्टीव्हेटर करून रोटावेटर मारून जमिनीची मशागत केली जाते. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस एकरी चार ट्रैक्टर कुजलेल्या शेणखताचा वापर केला जातो. त्यानंतर साडेचार फूट अंतरावर बेड पद्धतीने ठिबक सिंचनाचा वापर करून यावर लागवड करताना बीजप्रक्रिया करून लागवड केली जाते. सुरुवातीला झेंडू, मिरची अशी आंतरपिके म्हणून घेतली जातात, पिकाचा कालावधी हा साडेआठ महिने असला तरी या पिकाच्या माध्यमातून उत्पादन देखील विक्रमी मिळत असते. योग्य तंत्रज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर पिकांवर होणाऱ्या खतांचा वापर, वेळेवर होणारे रोग कीड नियंत्रण यामुळे या पिकांपासून उत्पादनही चांगले मिळते.

एकत्रित शेती उपयुक्त 

मागील आठ ते दहा वर्षांपासून या भागात जवळपास अनेक शेतकरी आले शेती करत आहेत. आले पिकातून चांगले उत्पादन मिळत असले तरी या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान समजून घेत या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. उत्पादन तंत्रज्ञान, योग्य वेळी व्यवस्थापन या गोष्टी शेती क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच भदे कुटुंब करते. त्यामुळे त्यांना विक्रमी नफा या माध्यमातून मिळत आहे. अनेक शेतकरी एकत्र आल्यामुळे आले शेतीवरच्या ज्या समस्या आहेत या समस्यांवरदेखील त्यांना काही अंशी उपाययोजना एकत्रित शेतीच्या माध्यमातून करणे सहज शक्य होते.

पीक व्यवस्थापन महत्वाचे 

आले उत्पादक शेतकरी अमोल भदे म्हणाले की, योग्य पद्‌धतीने नियोजन केले आणि कभी लचर्चात जास्त उत्पादन घेतले तर शेती परवडू शकते. यासाठी गरज आहे ती उत्पादन खर्च कमी करून एकरी उत्पादन वाढवण्याची. हेच आम्ही करतो. यामुळे आम्हाला आले बरोबरच इतर शेतीदेखील फायदेशीर ठरत असते. तर पीक संरक्षण विभाग प्रमुख भरत दवंगे म्हणाले की, शेतीत उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, स्लरी तंत्रज्ञानाचा पापर, एकात्मिक रोग कीड नियंत्रण, माती परीक्षणानुसार खतांचा वापर आणि जिवाणू खतांचा वापर याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :शेतीअहमदनगरशेती क्षेत्रशेतकरी