- मुखरू बागडे भंडारा : शेतीकडे नकारात्मक नजरेने पाहणाऱ्यांसाठी पालांदूर येथील अरुण पडोळे हे एक जिवंत उदाहरण ठरत आहेत. शेती एकमेव क्षेत्र आहे जे सर्वसामान्यांना रोजगाराची शाश्वती देऊ शकते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.
पडोळे मागील दहा वर्षांपासून मिरची शेतीत (Chilly Farming) सातत्याने प्रयोगशील काम करत आहेत. गत दहा वर्षांपासून मिरची उत्पादनात त्यांचा हातखंडा आहे. अवघ्या दोन एकर मिरचीच्या बागेत ३.५० लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत पोहोचत आर्थिक संपन्नता खेचून आणली आहे. इतर पिकांपेक्षा वातावरणातील बदलांमुळे मिरची पीक घेणे कठीण मानले जाते.
बारीक पाखरे, फुलकिडे व चुरडा-मुरड्याच्या प्रकाराने कित्येक मिरची बागायतदार संकटात सापडतात. मात्र, अरुण यांनी किडीवर नियंत्रण मिळवीत दोन लाख रुपयांवर हिरवी मिरची विकली. २१ दिवसांच्या अंतराने हिरव्या मिरचीचा दुसऱ्यांदा तोडा केला. दरही चांगला मिळाला. पावसाळ्यात मिरची पिकाला पाण्याचा धोकाही त्यांनी ओळखत त्यावरही मात केली.
आता लाल मिरचीचा तोडाहिख्या मिरचीचे बाजारभाव घसरल्याने अनेक शेतकरी चिंतेत असताना अरुण पडोळे यांनी अभ्यासू दृष्टीकोन ठेवत वेगळा निर्णय घेतला. त्यांनी हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी ठरला.
१४०-१५० दर...लाल मिरचीच्या दरात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. मागणी लक्षात घेता, पालांदूर व परिसरात १४०-१५० रुपये दराने लाल मिरचीची विक्री सुरू आहे. शेतातूनच मिरचीची विक्री थेट ग्राहकांना करणार आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता, ग्राहकांचे स्थानिकच्या मिरचीला पसंती मिळत आहे. यात ५० मजुरांना ९ महिने काम मिळाले, हे विशेष!