धुळे : साक्री तालुक्यातील आष्टाणे येथील प्रगतिशील शेतकरी कमलेश सोनवणे यांनी ४ एकर क्षेत्रावर टरबूज पीक (Tarbuj Farming) घेत यंदा चांगला नफा कमवला आहे. वेगळे पीक घेण्याचा त्यांचा प्रयत्न चांगला यशस्वी झाला असून, त्यांनी चार एकरांत ५० टन उत्पादन घेतले असून, यात १७ रुपये भावाने खर्च वगळता, ७ लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
कमलेश सोनवणे यांनी यावर्षी रब्बी हंगामात (Rabbi Season) चार एकरवर टरबूज लागवड केली आहे. रोटर करून त्यांनी चार बाय सहा अंतरावर बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर टाकले. ठिबक हे आधीच असल्याने लागवडीमध्ये त्यांनी रोपणऐवजी बियाणांची लागवड पद्धत वापरली. बियांची टोकन पद्धतीने लागवड केल्यामुळे खर्चातही मोठी बचत झाली.
चार एकर टरबुजाचे पीक (watermelon Farming) जोपासण्यासाठी त्यांना जवळपास दीड लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. टरबुजाच्या वेलींना सध्या चार ते सहा किलो वजनाची फळे लागली असून, व्यापाऱ्यांमार्फत १७ प्रतिकिलो दराने विक्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उत्पादन झालेले टरबूज हे दोन ते चार किलोंपर्यंतच्या वजनाचे असल्याचे सांगण्यात आले.
उत्कृष्ट नियोजनामुळे चांगला नफा..कमलेश सोनवणे यांनी उत्कृष्ट नियोजनाने टरबुजाचे उत्पादन घेतले. टरबुजांची राज्याबाहेर विक्री केली. दिल्ली, राजस्थानसह मुंबई येथील बाजारपेठेत मालाची विक्री केली. त्यांना अल्पावधीत चांगला नफा मिळाल्याने पंचक्रोशातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.
टरबुजाची चार एकरांवर लागवड करण्यात आली होती. टरबूज पिकाची लागवड केल्यानंतर काही दिवसांनी अवकाळी पाऊस पडत असतानाही योग्य पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न काढण्यात यशस्वी झालो आहे. टरबूज लागवड करणे पाहिजे तेवढे सोपे नाही. त्यासाठी वेळोवेळी फवारणी करावी लागते. त्यामुळे खर्च हा मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, यावर्षी उत्पन्न चांगल्या प्रकारे निघाल्यामुळे, शेतीचा झालेला खर्च निघाला.- कमलेश सोनवणे, प्रगतिशील शेतकरी, आष्टाणे.