नाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील शेतकरी विजय बबन पवार यांनी डाळिंबशेतीत वेगळा प्रयोग केला आहे. पारंपरिक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडत इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय खतांची मदत घेत केवळ १ लाख ९० हजार रुपयांत उत्पादन खर्च करून एकूण ७ लाखांचे उत्पन्न मिळविले.
कोरोना काळात मुलांच्या शिक्षणासाठी मालेगावमध्ये वास्तव्यास असलेले विजय पवार गावी परतले आणि वडिलोपार्जित जमिनीत नव्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डाळिंबच्या 'शेंद्रया' जातीची निवड करून प्रति एकर ४०० झाडांची लागवड केली. या शेतीत त्यांनी इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित ठिबक सिंचन प्रणाली, नैसर्गिक व सेंद्रिय खते, वेळेवर फवारणी आणि मधुपालन हे घटक आत्मसात परिणामी, केले.
दर्जा उत्पादनाचा इतका उंचावला की, व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करू लागले. त्यांनी निवडलेली 'शेंद्रया' जात ही निर्यातीसाठी सर्वोत्तम मानली जाते. पहिल्याच वर्षी प्रति एकर ७ टन उत्पादन घेत प्रति किलो १२० रुपये असा विक्रमी दर मिळवला.
त्यांनी केवळ १ लाख ९० हजार रुपयांत उत्पादन खर्च करून एकूण ७ लाखांचे उत्पन्न मिळविले. याला फळ यायला वेळ लागतो, पण बाजारात दरही अधिक मिळतो. त्यांचा हा प्रयोग तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रतिएकर खर्च किती आला? ५० रुपया प्रमाणे २० हजार रुपयांची ४०० रोपे आणली. ठिबक सिंचनासाठी १ लाख रुपये, फवारणीसाठी ५० हजार रुपये, मजुरीसाठी २० हजार रुपये असा एकूण १ लाख ९० हजार रुपये खर्च आला. तर उत्पन्न जवळपास ७ लाख ५० हजार रुपयांचे झाले. यानुसार पवार यांना ५ लाख ६० हजार रुपये नफा झाला.
आजची तरुण पिढी शेतीकडे दुर्लक्ष करून शहराच्या सुखसोयी आणि चंगळवादाकडे वळत आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून, तरुण पिढीने शेतीलादेखील तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. - विजय पवार, शेतकरी, सौंदाणे