Join us
Daily Top 2Weekly Top 5

दगडधोंड्यांत फुलवली चंदनाची शेती, पाच एकरांत लागवड, आता एकरी लाखोंची कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:20 IST

Sandalwood Farming : कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चंदनाची शेती केली जाते. मात्र....

- रेमाचंद निकुरेSandalwood Farming :  सुवासिक गुणधर्मामुळे चंदनाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चंदनाची शेती केली जाते. मात्र, अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातही चंदन शेती यशस्वी होऊ शकते, हे आरमोरी तालुक्यातील शेतकरी शरद लक्ष्मण मेश्राम यांनी आपल्या कष्टातून सिद्ध करून दाखविले आहे. दगडधोंड्याच्या पाच एकर शेतात त्यांनी चंदनाची लागवड करून इतर शेतकऱ्यांसमोर उद्योगी शेतीचा आदर्श घालवून दिला आहे.

आरमोरी-वैरागड मार्गालगत असलेल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात त्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत, वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. पाच एकर क्षेत्रांत चंदनाची लागवड केली. आगामी दहा वर्षात चंदन शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा आत्मविश्वास शरद मेश्राम व्यक्त करतात. शेतीकडे लक्ष देत असतानाच ते फावल्या वेळेत सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून, परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

फळझाडांसह चंदनाची लाल व पांढरी रोपटीशेतकरी शरद मेश्राम यांनी पाच एकरांत काही फळपिकांसोबत लाल आणि पांढऱ्या चंदनाची ४०० झाडे लावली. सुरुवातीच्या काळात अनेकांनी या प्रयोगाकडे संशयाने पाहिले. मात्र, मेश्राम यांनी संयम, अभ्यास आणि सातत्य यांचा आधार घेत प्रयोग सुरूच ठेवला. योग्य संगोपन व काळजीमुळे आज त्यांच्या शेतातील चंदनाची झाडे पाच वर्षांची असून, १० ते १५ फूट उंचीची झाली आहेत. हा प्रयोग यशस्वी ठरत असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात. विशेष म्हणजे, राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ न घेता, केवळ स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी चंदनाचा हा मळा फुलवला आहे.

नर्सरीतून आणली रोपटीशेतकरी शरद मेश्राम यांनी परजिल्ह्यातून नर्सरीतून चंदनाची रोपटी आणली. ही रोपटी ठाणेगावपासून पाच किमी अंतरावरील शेतात लावली. ही शेती ठाणेगाव- वैरागड मार्गालगत आहे. शेतकरी मेश्राम यांनी केलेली ही अनोखी शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ते शेतातील झाडांचे संगोपन करीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी दिशादर्शकगडचिरोलीसारख्या भागातही चंदन शेती शक्य आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करत शरद मेश्राम यांनी शेतीतील नव्या शक्यतांचा मार्ग खुला केला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे आरमोरी तालुक्यासह संपूर्ण परिसरातून कौतुकाचा सूर उमटत असून, अनेक शेतकऱ्यांसाठी ही यशोगाथा नवा आदर्श ठरत आहे. अनेक शेतकरी भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli Farmer Cultivates Sandalwood on Barren Land, Earns Lakhs

Web Summary : Sharad Meshram, from Gadchiroli, cultivates sandalwood on five acres of rocky land. He planted 400 sandalwood trees alongside fruit trees, inspiring local farmers. His success proves sandalwood farming is viable in Gadchiroli, yielding substantial income.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रशेतीगडचिरोली