Join us

शेवाळे बंधूंनी ब्रीडर बोकडाच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्पन्न कसे वाढवले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 10:11 AM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील योगेश कैलास शेवाळे व मोठे बंधू अविनाश यांची एकत्रित बोरसर ता. वैजापूर येथे १४ एकर जिरायत शेती आहे. २०१९ मध्ये गुजरात व पंजाब राज्याच्या काही गावांमध्ये फिरून त्यांनी शिरोही व बीटल जातीच्या शेळ्या व बोकड खरेदी केले.

रविंद्र शिऊरकरछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील योगेश कैलास शेवाळे व मोठे बंधू अविनाश यांची एकत्रित बोरसर ता. वैजापूर येथे १४ एकर जिरायत शेती आहे. प्रामुख्याने डाळिंब बाग, कांदा, कपाशी, गहू, मका आदी पिके ते घेतात. यातून संपूर्ण कुटुंबांची मजुरी, देखभाल खर्च वजा जाता अपेक्षित उत्पन्न म्हणून हाती फारसं काही मिळत नव्हते. मग योगेश यांनी आपले भाऊ अविनाश यांच्याकडे शेतीची सूत्रे सोपवली. तर आपण स्वत: पत्नी मनिषा समवेत शेतीपूरक जोडधंद्याकडे वाटचाल सुरू केली.

शेळीपालनास सुरुवात आणि विस्तारत्यानंतर २०१९ मध्ये राजस्थान व पंजाब राज्याच्या काही गावांमध्ये फिरून त्यांनी शिरोही व बीटल जातीच्या शेळ्या व बोकड खरेदी केले. तेथूनच त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली. व्यवसायातील सातत्य, कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज शेळीपालनात प्रगती साधली आहे.घराच्या अंगणामधून सुरुवात झालेल्या या शेळीपालनाकरता आज त्यांनी ८५ फूट लांब ४५ फूट रुंद, ९५ फूट लांब ४५ फूट रुंद असे दोन अद्यावत शेड उभारलेले आहेत. त्याला नाव दिलंय-यशोधन गोट फार्म.

शेवाळे यांच्या या यशोधन गोट फार्म मध्ये गाभण शेळी, आजारी शेळी, बोकड, पिल्ले आदींचे वेगवेगळे भाग करण्यात आलेले आहेत. व्यवसायात सुरुवातीला काही प्रमाणात मरतुक झाली, पण हळूहळू योग्य व्यवस्थापन करत आज त्यांच्याकडे ३५ बीटल, २० शिरोही शेळ्या असून सर्व गाभण आहेत. तसेच ४० ते ४५ करडं देखील आहेत, ज्यात आज घडीला शून्य मरतुक असल्याचे शेवाळे सांगतात.

शेळ्यांचे चारा व्यवस्थापन व आरोग्य शेळ्यांच्या चाऱ्या करिता ७ ते ८ गुंठे मेथी घास, १३ गुंठे ४ जी नेपियर यांची लागवड केलेली असून खरीप आणि रब्बी हंगामात १ ते २ एकर मका उत्पादन घेतलं जातं. या मका चाऱ्यापासून मुरघास केला जातो व मक्याची भरड शेळ्यांना खुराकात दिली जाते. 

सकाळी ६ वाजता गहू, सोयाबीन, मका यांचा भरडा, त्यानंतर ८ वाजता मुरघास, दुपारी मेथीघास व रात्रीला नेपियर कुट्टी आदी शेळ्यांना वैरणीत दिले जाते. तसेच योगेश यांनी शेळ्यांच्या आरोग्य बाबत वेळोवेळी डॉक्टरांच्या मदतीने केलेले उपचार बघत त्यांच्या नोंदी जपून ठेवल्या आहेत. आता ते स्वतः शेळ्यांवर प्राथमिक उपचार करतात. त्यांच्याकडे औषधोपचाराकरिता लागणारे सर्व घटक देखील उपलब्ध आहेत. नियमित लसीकरण व आजारांचे लक्षणे दिसताच वेळेवर उपचार केल्यास शेळीपालनात तोटा होत नसल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

जातिवंत बोकडांची मागणी व उत्पन्न शेवाळे यांच्याकडे असलेल्या बीटल आणि शिरोही या दोन मुख्य ब्रिडर बोकडांची ब्रीडिंगसाठी अनुक्रमे १,२५,००० व ८५,००० रुपयांना मागणी झालेली असून अद्याप शेवाळे यांनी हे बोकडं विकलेले नाहीत. पैदावर बोकडांची तसेच शेळ्या व पिल्लांची विक्री यातून वर्षाकाठी शेवाळे याना वार्षिक ५ ते ६ लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. गाभण काळात योग्य व्यवस्थापन केल्याने  बीटल मध्ये ६ ते ७ व शिरोही मध्ये ४ ते ५ किलोचे करडं जन्मल्याचे शेवाळे सांगतात, ज्यात बोकडांना ३ महिन्यात २० हजार रुपये प्रत्येकी मागणी असते.

टॅग्स :शेळीपालनशेतकरीवैजापूरपीकशेती