Join us

ताजी स्ट्रॉबेरी आता पिकतेय तुळजापुरात! १२ गुंठ्यात यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 10:03 AM

केवळ चार महिन्यात दीड लाख रुपयांचे घेतले उत्पन्न, केवळ शेणखत वापरत...

स्ट्रॉबेरी म्हटलं की पहिल्यांदा महाबळेश्वर परिसरातील शेती कोणाच्याही डोळ्यासमोर येते; पण तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) येथील भावंडांनी १२ गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून, चारच महिन्यांत दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, याची शाश्वती त्यांना आहे.

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) येथील अमोल लोमटे व सचिन लोमटे या भावंडांकडे आठ एकर शेती असून, यात ते पारंपरिक पिके सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, ऊस घेतात. १२ गुंठे जमिनीवर पाचगणीहून आणलेल्या स्ट्रॉबेरीच्या पाच हजार रोपाची लागवड केली. सुरुवातीला जमिनीत कुठलेही खत न वापरता शेणखत वापरण्यात आले. जैविक खते, फवारणी करण्यात आल्याचे लोमटे म्हणाले.

संबंधित वृत्त- मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा अफलातून प्रयोग! दहा गुंठ्यात केली पाच लाखांची कमाई

स्ट्रॉबेरीची शेती केली, मात्र याला आपल्या भागात मार्केट नाही. तरीही आम्ही मागे हटलो नाही. त्यानंतर सोलापूर, तुळजापूर येथील व्यापाऱ्यांना आम्ही मागणीप्रमाणे स्ट्रॉबेरी देत आहोत. शेतात येऊनही लोक घेऊन जातात. स्ट्रॉबेरी लागवड, खते, फवारणी यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला आहे. खर्च वजा जाता दोन लाख रुपये हाती राहतील. - अमोल लोमटे, शेतकरी

सचिन लोमटे खासगी कंपनीत पुणे येथे नोकरीस होता, कोरोना काळात गावी आला, भावासोबत शेती करू लागला. नवीन काहीतरी करण्याच्या इष्येंतून दोन वर्षांपूर्वी खरबूज घेतले. पहिल्या वर्षी चांगले उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी मात्र लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यानंतर सचिन लोमटे यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. पाचगणी येथे जाऊन स्ट्रॉबेरी शेतीची माहिती घेतली, १२ गुंठे जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित वृत्त-आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या पडकई कार्यक्रम, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तत्त्वत: मंजुरी

पाचगणीहून ६० हजार रुपयांची पाच हजार रोपे आणली व त्याची ऑक्टोबर २०२३ मध्ये लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारण दीड महिन्यातच फळ लागण्यास सुरुवात झाली, त्यांनी आतापर्यंत दीड लाख रुपयांचे उत्पन्न यातून मिळवले आहे. आणखी दोन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. सहा महिन्यांत साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे सचिन लोमटे यांनी सांगितले. दरम्यान, लोमटे भावंडांनी विपरीत हवामान असूनही कष्ट घेत स्ट्रॉबेरीची शेती सलगरा शिवारात यशस्वी करुन दाखविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

शेणखताचा केला वापर

१२ गुंठे जमिनीवर पाचगणीतून आणलेल्या स्ट्रॉबेरीच्या पाच हजार रोपाची लागवड केली. सुरुवातीला जमिनीत कुठलेही खत न वापरता शेणखत वापरण्यात आले. जैविक खते, फवारणी करण्यात आल्याचे लोमटे म्हणाले.

 

टॅग्स :तुळजापूरशेती