Join us

पाच एकर कपाशीला एक एकर आलं भारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 8:55 PM

एकरी सरासरी ९ ते १० लाख उत्पन्न 

- रविंद्र शिऊरकर

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) :  शेती करताना शेतात काही प्रयोग केले नाही तर तो शेतकरी कसला? पारंपरिक कपाशी, मका, तुर, कांदा, टोमॅटो पिकांसोबत प्रयोग म्हणून लावलेली आद्रक फायद्याची ठरली म्हणून मागच्या सहा सात वर्षांपासून एक एकर आलं पिक हमखास घेतलं आणि या सातत्याने गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून सुधारणा करत आज राहुल बाबासाहेब डुबे हे शेतकरी एक एकर आलं पिकांतून पाच एकर कपाशीच्या उत्पन्नाची बरोबरी करत आहे. 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखोडा येथील राहुल डुबे यांची १० एकर जिरायती शेती असून त्यातील एक एकर क्षेत्रात ते सध्या दर वर्षी हमखास आद्रक पिक घेत असून उर्वरित शेतात कपाशी, मका, तुर, गहू अशी पिके घेतात. या माध्यमातून ते चांगले अर्थार्जन करत आहेत. 

व्यवस्थापन व उत्पन्न एकरी ३-४ ट्रॉली शेणखत टाकून शेतीची मशागत करून आलं लागवड केली जाते. ठिबक सिंचन केले असल्याने अल्प पाण्यात व कमी मेहनतीत आलं सुलभ झाले असून ज्यास सुरुवातीला डी. ए. पी, निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट, सुक्ष्म अन्नद्रव्ये आदींचा बेसल डोस दिला जातो. नंतर किडींचा व बुरशीचा प्रादुर्भाव बघता आवश्यक ती फवारणी घेतली जाते. गेल्या वर्षी राहुल यांना एकरी १४० क्विंटल आलं उत्पादन मिळालं होतं. सुरुवातीला बाजारभाव कमी असल्याने तेव्हा अवघ्या ३६०० रुपये दराने ३-४ लाख उत्पन्न मिळाले होते तरीही ते कपाशीच्या तुलनेत अधिक असल्याचे राहुल सांगतात. 

बाजारभाव प्रतिकूल राहिल्यास अधिक फायदा मागच्या वर्षी हंगामाच्या शेवटी आल्याचे बाजारदर हे दहा हजारांच्या पुढे गेले होते. या वर्षी देखील जर बाजारभाव त्या तुलनेत मिळाले तर या वर्षीचा राहुल यांनी बांधलेला उत्पादन अंदाज एकरी १५० क्विंटल असून त्यातून त्यांना सरासरी ९ ते १० लाख रुपये उत्पन्न एका एकरात मिळेल अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी