Join us

सजावटीसाठी मागणी असणाऱ्या डेजी पिंक व डेजी ब्ल्यू फुलांची शेती देतेय लाखोंचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:21 IST

निमगाव-दावडी परिसरात जमिनीचे क्षेत्र खूप मोठे आहे. निमगाव खंडोबा येथील शेतकरी विजय नानाभाऊ कोठावळे यांनी प्रथमच या परिसरात स्वतःच्या शेत जमिनीत डेजी पिंक व डेजी ब्लू या फुलांची लागवड करून वर्षाला लाखो रुपयांचे फुलांचे उत्पादन मिळवले आहे.

राजेंद्र मांजरेनिमगाव-दावडी परिसरात जमिनीचे क्षेत्र खूप मोठे आहे. निमगाव खंडोबा येथील शेतकरी विजय नानाभाऊ कोठावळे यांनी प्रथमच या परिसरात स्वतःच्या शेत जमिनीत डेजी पिंक व डेजी ब्लू या फुलांची लागवड करून वर्षाला लाखो रुपयांचे फुलांचे उत्पादन मिळवले आहे.

मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द असली की या फूल मळ्यातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, असे शेतकरी विजय कोठावळे यांनी सांगितले.

निमगाव दावडी रस्त्यालगत कोठावळे यांनी आपल्या ५० गुंठे जमीन क्षेत्रात डेजी पिंक व डेजी ब्ल्यू या फुलांची लागवड केली आहे. सोळू (ता. खेड) येथून फुलांचे रोप आणून ऑगस्ट महिन्यात रोपांची लागवड केली.

औषध फवारणी खते व पिकाची काळजी घेतली. चार महिन्यानंतर पीक जोमात आले. फुलाची काढणी करून व्यवस्थित पॅकिंग करून पुणे, गुलटेकडी येथे विक्री करत आहे.

फुलांच्या एका गड्डीला तीस ते पस्तीस रुपये बाजारभाव मिळत आहे. लग्नसराईत या फुलांना चांगली मागणी असते. ही फुले आठवडाभर कोमेजत नसल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो.

या फुलांना सुगंध नसला तरी आकर्षक दिसत असल्यामुळे फुलांचा उपयोग फूल गुच्छ, हार, सजावट, लग्न समारंभ डेकोरेशन तसेच विविध कार्यक्रमात या फुलांचा उपयोग केला जात असल्याचे कोठावळे यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील सोळू धानोरे या परिसरातील शेतकरी या डेजी पिंक डेजी ब्लू या फुलाचे उत्पादन घेत आहेत. ही फुलांची रोपे मूळ कर्नाटक राज्यातून आले असल्याचे शेतकरी सांगतात.

शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना व योग्य मार्गदर्शन व शेतीसाठी हव्या असणाऱ्या सोयीसुविधा दिल्यास शेतकऱ्यांमध्ये प्रगती होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असे शेतकरी कोठावळे यांनी सांगितले.

नांगरणी, रोटाव्हेटर मशागत, रोपे व उत्पादन खर्च, लागवड मजुरी, तोडणी वाहतूक, खते, औषधी, फवारणी, बाजारपेठ वाहतूक असा एक लाखापेक्षा अधिक खर्च एकरी येत असल्याचे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

रोपांची छाटणी, काळजीकोमेजून गेलेली फुले छाटून टाका. त्यामुळे नवीन फुले चांगली येतात वारंवार फुले येतात. मुळांची अधिक वाढ झाली तर झाडांची गर्दी होते व त्याचा फुल उत्पादनावर परिणाम होतो. त्यासाठी जास्त गर्दी झालेले मुळांचे गड्डे काढून तुम्ही त्यांची पुनर्लागवड करू शकता यासाठी पुनर्लावणी १०-१२ इंच अंतरावर करा. यामुळे गर्दी न होता फुलांचे उत्पादन चांगले मिळते व अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित होते. गड्डे पुनर्लागवडीतून क्षेत्र वाढते.

टॅग्स :फुलशेतीशेतकरीशेतीपीकफुलंबाजार