Join us

खानापूरच्या माळरानावर प्रयोग म्हणून केलेली रेशीम शेती बनली कुटुंबाचा मुख्य व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:28 AM

संकटातही संधी शोधणारा घाटमाथ्यावरचा शेतकरी हार न मानता नवनवीन प्रयोग करू लागला. असाच प्रयोग खानापूर येथील बापू मंडले व आनंदराव मंडले बंधूंनी केला. त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला.

संदीप मानेखानापूर: सातत्याने हवामानात होणारा बदल, शेतमालाच्या दरात होणारे चढ-उतार, वाढती मजुरी, औषधांच्या भरमसाठ किमती यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पण संकटातही संधी शोधणारा घाटमाथ्यावरचा शेतकरी हार न मानता नवनवीन प्रयोग करू लागला.

असाच प्रयोग खानापूर येथील बापू मंडले व आनंदराव मंडले बंधूंनी केला. त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर जनावरांच्या गोठ्यात रेशीम संगोपनाचे शेड तयार करून दहा गुंठ्यांत तुतीची लागवड केली.

त्यानंतर त्यांना वेळोवेळी सांगली जिल्हा रेशीम उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांची रेशीम शेती बहरली असून, त्यांनी आता सात एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे.

गोठ्यामधून सुरुवात केलेला रेशीम उद्योग त्यांनी मोठ्या शेडमध्ये स्थलांतरित केला आहे. त्याठिकाणी त्यांनी आधुनिक पद्धतीने रेशीम शेती सुरू केली आहे. सुरुवातीला एक प्रयोग म्हणून सुरुवात केलेली रेशीम शेती आज त्यांच्या कुटुंबीयांचा मुख्य व्यवसाय बनला आहे.

आपल्या अभ्यासपूर्ण रेशीम शेतीमुळे आज रेशीम शेतीची माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्याकडे येत असतात. जिल्हा रेशीम उद्योग केंद्राच्या वतीने नवीन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी बोलावले जाते.

नुकतीच राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने जिल्हा रेशीम उद्योग केंद्राने त्यांच्या शेतावर रेशीम कार्यशाळा आयोजित केली होती. आज त्यांच्या रेशीम शेतीचा आदर्श घेऊन खानापूर घाटमाथ्यावरील अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीमध्ये उतरण्याचे धाडस केले आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग फायदेशीर ■ मी गेल्या तीन वर्षांपासून रेशीम शेती करतोय. सुरुवातीला दहा गुंठे क्षेत्रात मी तुती लागवड केली होती. आज आमच्याकडे एकूण सात एकर क्षेत्रात तुती आहे. १०० अंडी पुंजासाठी साधारणपणे ४००० रुपये खर्च येतो. ■ शासनाच्या हमी भावाप्रमाणे दर मिळाल्यास ४० ते ४५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. रेशीम शेती करण्यासाठी कमी भांडवल व कमी मजूर लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय फायदेशीर आहे. ■ अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग व्यवसाय खूप फायदेशीर आहे. गुंतवणूक आणि जमीन खूप कमी लागत आहे, अशी प्रतिक्रीया प्रगतशील शेतकरी बापू मंडले यांनी दिली.

अधिक वाचा: जीवन पडला मधुकामिनीच्या प्रेमात; लागवड केली अन् आला फारमात

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीशेतीखानापूरपीक