Join us

डोंगराळ जमिनीच्या तुकड्यावर सुपारीची बाग फुलवणाऱ्या 'टनल मॅन'चा अनोखा प्रवास

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 04, 2024 2:35 PM

डोंगराळ जमिनीवर अखंड संघर्षातून या अवलियानं जमिन कसून सुपारीची बाग फुलवली

माणसाची इच्छाशक्ती असंभव वाटणारं कामही सहज शक्य करून दाखवणारी. याचं जिवंत उदाहरण कर्नाटकाच्या अद्यानडका गावात आहे. डोंगराळ भागातलं छोटंसं खेडेगाव. गावातल्याच एका श्रीमंत शेतकऱ्याच्या नारळ आणि सुपारीच्या त्याच्या बागेत हा मनापासून काम करायचा.  त्याचं ईमान आणि कामाची हातोटी पाहून या बागेचे मालक महाबाला भट यांनी डोंगरावरच्या जमिनीचा एक पडीक तुकडा बक्षीस म्हणून देऊन टाकला. ही गोष्ट १९७८ ची.. 

माळरानावरच्या या जमिनीवर पाणी कसे आणायचे हा त्याच्यासमोर यक्षप्रश्न. डोंगराच्या पायथ्याशी साठलेले पावसाचे पाणी  अडवण्यासाठी त्याने हळूहळू चर खोदायला सुरुवात केली.  प्राचीन काळातल्या पद्धतींप्रमाणे बोगदा खोदायचा ठरवला आणि लागले कामाला. मालकाच्या शेतातील काम सुरुच होतं. ते काम झालं की रात्री दिवे घेऊन बोगदा खणायला निघायचे असा दिनक्रम झाला. सकाळी ७ आठ वाजता सुरु झालेलं काम रात्री अगदी ९ पर्यंत चालू लागले.  जिद्द आणि चिकाटीच तेवढी होती!

पहिला बोगदा खणायला घेतला तो २० मीटरपर्यंत खोदल्यावर कोसळला. असं चार बोगद्यांच झालं. मुंगी जशी भींतीवरून पडल्यावर पुन्हा त्याच दमाने चढते त्याच चिकाटीने पाचवा बोगदा खणायला घेतला. आणि ३५ मी खणल्यावर बोगद्यात पाण्याचा एक झरा लागला. मग सुपारीच्या खोडाचा पाइप करून पाणी कसंबसं घरापर्यंत आणलं आणि पाण्यासाठी मोठा हौद तयार केला.

काही वर्षांपूर्वी केलेल्या या मेहनतीला आता यश आलं. वेड्या स्वप्नांच्या शोधात एकट्याच्या दमावर या पठ्ठ्याने सलग आठ वर्ष काम करत २३ हजार तास काम केले. आणि ऑल्मपिकच्या स्विमिंग पुलापेक्षाही मोठा बोगदा खणला.

पाण्याचा संघर्ष एवढ्या तासांचा होता! पण या पाण्याचा वापर करत त्या डोंगराळ जमिनीच्या तुकड्यावर या अवलियानं जमिन कसून सुपारीची बाग फुलवली. आज या जमिनीवर 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती आहे, आणि ऊर्जेचा वापर शून्य. 

वयाची सत्तरी ओलांडलेल्या या शेतकऱ्याचा २०२२ रोजी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. याचं नाव अमई महालिंगा नाईक. त्याच्या या कामाची सरकार दरबारी दखल घेतली गेली आणि त्याला टनल मॅन अशी ओळख मिळाली. आजही हा धाडसी टनल मॅन त्याची शेती सेंद्रीय पद्धतीनं करतोय हे विशेष..

टॅग्स :सेंद्रिय शेतीपद्मा लक्ष्मीशेतकरी