Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Mosaic: सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगासाठी करा हे सोपे उपाय

By बिभिषण बागल | Updated: July 31, 2024 16:25 IST

यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन Soybean mosaic virus पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते.

हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

रोगाची लक्षणे१) सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.२) काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते.३) दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.४) हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन करावे.

सोयाबीनवरील पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन

  • काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी.
  • लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी समूळ काढून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
  • रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.
  • पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
  • नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा.
  • मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.
  • कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे.
  • पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
  • बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
  • पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी. 

डॉ. जी. डी. गडदे, डॉ. डी. डी. पटाईत आणि श्री. एम. बी. मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी०२४५२ - २२९०००

टॅग्स :सोयाबीनकीड व रोग नियंत्रणपीकखरीपशेतकरीशेतीपरभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ