Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेतीचं आधुनिक तंत्र, पेरणीला वापरा बी.बी.एफ. यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 14:35 IST

शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी करत असतात आणि याचाच परिणाम पिकांवर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते.

बी.बी.एफ. पेरणी पद्धत म्हणजे काय ?हे ट्रॅक्‍टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर ३ ओळी घेता येतात. 

फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सें.मी. गरजेनुसार ठेवता येते. कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण तर २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

बी.बी.एफ. पेरणी यंत्र कसे फायदेशीर ठरते ?बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्यास मुलस्थानी जलसंधारण होते. या पध्दतीत कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो.तरपिक पध्दतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न घेता येते.बीबीएफ पध्दतीने निविष्ठा खर्चात (बियाणे ,खते  इ.) 20 ते 25% बचत .खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.उत्पन्नामध्ये 25 ते 30% वाढ  होते.वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यामान खंडाच्या कालावधीत सुध्दा पाण्याचा ताणाची तीव्रता कमी होते.जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.पिकास मुबलक हवा सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होऊन पीक किड रोगास बळी पडत नाही.पिकामध्‍ये अंतर मशागत करणे उभ्या पिकांस सरी मधून ट्रॅक्‍टर/मनुष्‍य चलीत फवारणी यंत्राव्‍दारे किटकनाशक फवारणे शक्‍य होते.या पध्‍दतीचा अवलंब केल्‍याने जमिनीची धुप कमी प्रमाणात होऊन सेंद्रीय कर्बाचा ऱ्हास थांबल्‍याने जमिनीची जलधारण क्षमता वाढते.या पध्‍दतीमुळे जमिनीची सच्‍छीद्रता वाढून जमीन भूसभुसीत होते. परिणामी पिकाची वाढ उत्‍तम होते.तण नियंत्रण व अंतरमशागतीच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा वापर करता येतो. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे अंतरमशागत  आणि तण नियंत्रणासाठी व्ही, आकाराची पास बसविता येते तसेच सरीमध्ये रिजर ठेवून अंतरमशागत होते.

बीबीएफ पेरणीसाठी उपलब्‍ध पेरणी यंत्राचे प्रकारक्रीडा (CRID- Central Research Institute for dry land Agriculture ) हैद्राबाद विकसित चार फणी बीबीएफ पेरणी यंत्र.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी विकसीत पाच फणी बीबीएफ पेरणी यंत्र.या यंत्रामध्ये बियाणे खत पेरणीसह फवारणी आणि रासणी करता येते.

ट्रॅक्टरचलित  बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन, मका, हरभरा, तूर, भुईमुग, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, कापूस इत्यादी पिकांची टोकण पध्दतीने वरंब्यावर पेरणी करता येते. प्रत्येक पिकांकरिता वेगवेगळ्या बिजांच्या चकत्या आहेत. त्या सहजपणे बदलता येतात.

मी जून महिन्यात 0.70 आर क्षेत्रावर बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने  कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली  सोयाबीनची पेरणी केली. या यंत्राने पेरताना सोयाबीनचा दाना सारख्या अंतराने व खेालीवर पडतो. बियाणे खतांमध्ये बचत झाली. जास्त पाऊस झाला असतांनाही लगेच निचरा झाला. झाडांना सूर्यप्रकाश व हवा चांगली मिळाली. बीबीएफ वर पेरणी केल्यामुळे मला 0.70 आर क्षेत्रामधुन  14 क्विंटल उत्पन्न मिळाले. तेच मी पुर्वी प्रचलित पध्दतीने सोयाबीनची पेरणी करत असताना मला एकरी 4 ते 4.50 क्विंटल उत्पन्न मिळत होते. शेतकऱ्यांना ही पेरणीची पध्दत अत्यंत उपयुक्त असल्यामुळे याच पध्दतीने शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास ती अधिक फायदेशीर ठरेल.श्री.बबन त्रिंबक फोके, वरूड काजी, ता.जि. औरंगाबाद

मी जून महिन्यात 0.50 आर क्षेत्रावर बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली  सोयाबीनची जे एस 335 या जातीची पेरणी केली.मला 0.50 आर क्षेत्रामधुन 8 क्विंटल उत्पन्न मिळाले. तेच पुर्वी एकरी 4  क्विंटल उत्पन्न मिळत होते. ही पेरणीची पध्दत निश्चीतच फायद्याची आहे.–सौ.विजयाबाई जयंत देशमुख, जावतपूर, ता.जि. औरंगाबाद

टॅग्स :खरीपपेरणीशेतीमोसमी पाऊस