Usache Pachat : ऊस पाचट म्हणजे ऊसाचा पाला (Usache Pachat) काढल्यानंतर उरलेला भाग. ऊस पाचट हे नैसर्गिक खत असून, त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे, पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जमिनीची सुपीकता वाढते.
उसाची तोडणी झाल्यानंतर शेतात उरलेलं पाचट (Sugarcane Trash Management) जाळल्यामुळे जमिनीतील जीव-जंतूचा नाश तर होतोच, पण उसाच्या मुळांनाही उष्णतेची झळ बसते, पर्यायाने उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे असते.
कंपोस्ट बनवणे
- जमिनीत २ मीटर X ७ ते १० मीटर आकाराचा खड्डा घ्यावा.
- खड्ड्याच्या सभोवती बांध बांधावा.
- खड्ड्याच्या तळाला बारीक केलेल्या पाचटाचा १५ सेंटीमीटर जाडीचा थर पसरवून त्यावर पाणी शिंपडावे.
- दर ८ टनास ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे द्रावण शिंपडावे.
- त्यानंतर शेणकाला व १ किलो पाचट कुजवणारे जिवाणू यांचे द्रावण करून समान पसरावे.
- थरावर थर रचून खड्डा पूर्ण भरावा. त्याची उंची वरच्या बाजूने ६० सेंटिमीटर ठेवावी.
- वरच्या बाजूने ओल्या मातीने खड्डा बंद करावा. ३ ते ४ महिन्यात उत्तम कंपोस्ट तयार होते.
लागवडीपूर्वी शेतात पसरवावे
- लागवडीसाठी पाडलेल्या सर्यांमध्ये जवळच्या शेतातील गोळा केलेले पाचट पसरावे.
- पाचटावर हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १० किलो पाचट कुजवणारे जिवाणू विस्कटावे.
- यानंतर पाचट गाडण्यासाठी वरंब्याच्या ठिकाणी अवजाराच्या साह्याने सऱ्या पाडाव्यात (पाचटाच्या ठिकाणी वरंबे व वरंब्याच्या ठिकाणी सऱ्या).
- या सऱ्यात नेहमीच्या पद्धतीने उसाची लागण करून पाणी द्यावे.
- ४ महिन्यात पाचट कुजून उत्तम सेंद्रिय खत तयार होते. उसाच्या वाढीस त्याचा उपयोग होतो.
- नंतर नेहमीप्रमाणे वरंबे फोडून उसाची बांधणी करावी.
- शिफारशीप्रमाणे खताच्या व पाण्याच्या मात्रा द्याव्यात.
खोडवा उसात पाचटाचा वापर
- यासाठी लागणीपासूनच नियोजन करणे गरजेचे असते.
- लागण करताना ३.५ ते ४ फूट अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागण करावी म्हणजे ऊस तुटल्यानंतर या रुंद सरीमध्ये पाचट पसरवता येते.
- ऊस तुटल्यानंतर खोडवा जमिनीलगत छाटावा व सरीमध्ये पाचट पसरून द्यावे.
- पाचटावर हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १० किलो पाचट कुजवणारे जिवाणू कंपोस्ट मध्ये मिसळून टाकावे.
- खोडव्यात नांग्या असल्यास नांग्या भरून घ्याव्यात. पहारीने खोडव्याला शिफारस केलेली खताची मात्रा द्यावी.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ